छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे बादशाहा औरंगजेबाची कबर आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कबर हटवावी अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलन केले गेली. आता हा वाद मागे पडला असला तरी खुलताबाद शहाराचे नाव बदलावे अशी मागणी केली जात आहे. याच मागणीवर आता सपाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
“जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे. एखादे नवे शहर वसवले असते तर वेगळा मुद्दा होता. खुलताबाद शहराचे नाव बदलल्याने कायदा आणि सुव्यस्था तसेच महागाई कमी होत असेल तर आम्ही त्याला समर्थन देऊ,” असे अबू आझमी म्हणाले.
तसेच देशात महागाई वाढली आहे. शेजारील देश चीनकडून भाराताच्या भूमीवर कब्जा केला जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यात विकासाची गोष्ट झाली पाहिजे. भाईचारा वाढला पाहिजे, असं आमचं मत असल्याचंही अबू आझमी यांनी सांगितलं.
इतिहास दाखवला पाहिजे मात्र तो बनावट नसावा. राज्यात सांप्रदायिकता वाढायला नको. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असेही आझमी म्हणाले. तसेच वक्फ विधेयकासंदर्भात बोलताना त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. काही लोकं आपल्याला सेक्युलर समजतात, मात्र दुसरीकडे हिंदुत्वदेखील दाखवतात. काही लोक दोन्ही नावांवर स्वार होत आहेत, अशी टोलेबाजी आझमी यांनी केली.
खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर हटवावी अशी मागणी केली गेली. मात्र या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण आहे. भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी खुलताबादचं नाव बदलण्याची भूमिका घेतली. औरंगजेबाचं थडगं खुलताबादमध्ये आहे. मात्र ते खुलताबाद नसून रत्नपूर आहे. या रत्नपूरमध्ये खऱ्या अर्थाने धर्मासाठी कसं जगावं, कसं मरावं हा छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगाळा कळाला पाहिजे. तेथे छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक झालं पाहिजे. तसेच संताजी, धनाजी, तराराणी यांचंसुद्धा भव्य दालन झालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असं केनेकर यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र त्याला विरोध केला आहे. आता विमानतळाचं, शहरांचं, रस्त्यांचं, इमारतींचं, रेल्वे स्थानकांचं नाव बदलल्यानंतर आता भाजपाला वडिलांचं नाव बदलण्याचाही वेळ आली आहे, अशा शब्दांत जलील यांनी या मागणीवर टीका केली होती.