आदित्य ठाकरेंचं मिशन विधान परिषद, हॉटेलमध्ये आमदारांशी गटागटाने संवाद, राज्यसभेच्या पराभवानंतर ताकही फुंकून पिणार!

| Updated on: Jun 18, 2022 | 2:21 PM

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. ऐनवेळी काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे तसेच भाजपने पाचवा उमेदवार उभा केल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

आदित्य ठाकरेंचं मिशन विधान परिषद, हॉटेलमध्ये आमदारांशी गटागटाने संवाद, राज्यसभेच्या पराभवानंतर ताकही फुंकून पिणार!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बईः विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर मुंबईत हायप्रोफाइल ड्रामा सुरु आहे. आपल्या पक्षाचा आमदार निवडून यावा, यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष पूर्ण खबरदारी बाळगत आहे. इतर पक्षांच्या प्रभावाखाली येऊन आपला आमदार फुटू नये, यासाठी प्रत्येक सदस्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय. शिवसेनेनंदेखील सेना आणि अपक्ष आमदारांना (Shiv Sena MLA) पवई  (Powai)येथील रेनेसां हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवलंय. कालपासूनच या ठिकाणी आमदार दाखल झाले आहेत. विधान परिषदेची मतदान प्रक्रिया कशी आहे, तसेच इतर पक्षांच्या दबावाला कसे बळी पडू नये, यासंबंधीचं मार्गदर्शन आमदारांना केलं जात आहे. आमदारांशी संवाद साधण्याची महत्त्वाची जबाबदारी आदित्य ठाकरेंवर देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर रेनेसां हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या आमदारांशी संवाद साधण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आमदारांच्या गटा-गटांना बोलतं करण्याची, त्यांच्या मनमोकळा संवाद साधण्याची भूमिका ते बजावत आहेत. आज दुपारीच कोकणातील आमदारांची आदित्य ठाकरेंनी बैठक घेतली. त्यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच 20 जून रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासंदर्भाने सूचनाही दिल्या.

आता ताकही फुंकून पिणार…

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपच्या उमेदवारासमोर पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या उमेदराला चांगली मतं असतानाही नंबरगेम करत भाजपचा उमेदवार निवडून आला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जगाबाजी झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. तसंच नाराज आमदारांनी व्यक्त केलेल्या भावनाही प्रामाणिक असल्याची कबुली राऊतांनी दिली होती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत असा दगाफटका होऊ नये, याची पूर्ण खबरदारी शिवसेनेतर्फे घेतली जात आहे. विधान परिषद निवडणुकीला शिवसेनेचे दोन उमेदवार असून ते निवडून येण्यासाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ आहे. तरीही आमदारांची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.

10 जागांसाठी 11 उमेदवार

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. ऐनवेळी काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे तसेच भाजपने पाचवा उमेदवार उभा केल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. यातील उमेदवार पुढील प्रमाणे-

  • शिवसेना- सचिन अहिर, आमशा पाडवी
  • राष्ट्रवादी काँग्रेस- एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर
  • काँग्रेस- भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे
  • भाजपा- प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड