MLA Pankaj Bhoyar: कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यावर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी दिली गेली आहे. उच्च शिक्षित असलेले पंकज भोयर यांनी वर्धात भाजप वाढवण्यासाठी मोठे काम केले. काँग्रेसमधून आल्यानंतर भाजपमधील पक्षशिस्तीला प्रथम महत्व दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन महिन्यांपूर्वी वर्ध्यात सभा झाली होते. त्यावेळी त्याच्या नियोजनाची जबाबदारी भोयर यांनी पार पाडली होती. ते काम पाहून खुद्द पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे समाधानी झाले होते. त्यामुळे पक्षात इतर सर्व ज्येष्ठ आमदार व अस्सल भाजपचे असलेले आमदार असताना डॉ. भोयर यांची मंत्रिपदी वर्णी लागली. संघटन कौशल्य, स्वभाव व पक्षशिस्तीचे पालन, यामुळे त्यांना ही संधी मिळाली. त्यांनी राज्यमंत्री म्हणून ३६ व्या क्रमांकावर शपथ घेतली.
डॉ. पंकज राजेश भोयर हे कुणबी (ओबीसी) समाजातील नेते. त्यांचे शालेय शिक्षण सुशिल हिम्मतसिंगका विद्यालय वर्धा येथे झाले. त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या. ते बी. एस्सी., एम. ए. अर्थशास्त्र, पी. एचडी. झालेले आहेत. त्यांनी त्यांनी प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केले. प्राचार्य पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते नागपूर विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग विद्यार्थी विभाग परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. 2005 मध्ये दांडी मार्च मध्ये सहभाग झाले होते. 2006 मध्ये प्रेरणा यात्रा सहभाग घेतला होता. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद त्यांनी भुषविले आहे. राष्ट्रीय स्तरावर हँडबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. वर्ध्यात त्यांच्या विविध शिक्षण संस्था आहेत.
शिक्षण क्षेत्रातून राजकारणात आमदार पंकज भोयर यांनी प्रवेश केला. काँग्रेस नेते माजी आमदार रणजित कांबळे यांचे ते शिष्य होते. सन 2014 मध्ये काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. भाजप कसा पक्ष आहे, कसा पक्ष चालतो, हे त्यांनी समजून घेतले. त्यानंतर भाजपच्या ध्येय धोरणाशी ते समरस झाले. त्यानंतर वर्धा विधानसभा क्षेत्रातून 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये दुसऱ्यांदा त्यांची निवड झाली.
आता 2024 मध्ये तिसऱ्यांदा विजयी होत त्यांनी हॅट्ट्रिक केली. कोणाला नाराज नव्हे तर साधे दुखवायचे पण नाही, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे मतदार संघात त्यांची चांगली पकड आहे.