राज्यातील शाळांमधील शिक्षक मुख्यालयी थांबत नाहीत, असा आरोप करत शिक्षकांविरोधात रान पेटवणाऱ्या गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा शिक्षकांना चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मी शिक्षकांना हात जोडून विनंती करतो की या सर्व गोष्टी गंभीरतेने घ्या, असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे.
प्रशांत बंब म्हणाले, मी सातत्याने गेल्या 7 ते आठ वर्षांपासून राज्यातील शिक्षणाची अवस्था मांडत आहे. राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. मी त्याची कारणे सातत्याने समोर आणली आहे. देशातील पिढी घडवण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यामुळेच शिक्षकांना सैनिकानंतर गलेलठ्ठ पगार दिला जातो. मी आजही विनंती करतो,शिक्षकांनी गावामध्ये जाऊन मुक्कामी राहावे, असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले.
शिक्षकांना गावी मुक्कामी राहण्याबाबत प्रशांत बंब म्हणाले, 10 ते 4 या वेळेत शाळा शिकवण्याचे काम शिक्षकांचे नाही. त्यांनी 24 तास गावांमध्ये संस्कार आणि व्यसनमुक्ती करण्याचे काम करावे. पण दुर्देवाने सांगावे लागत आहे, शिक्षक त्यांची कर्तव्य बजावत नाहीत. उलट खोटी कागदपत्रे देऊन शासनाकडून विनाकारण पैशाची लूट करतात. ही बाब शिक्षक आणि आम्हा राजकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे.
शिक्षक स्वतःची मुले खाजगी शाळेत शिकवतात. ज्या शाळांमधील शिक्षकांना 15 हजारसुद्धा पगार नसतो. परंतु सरकारी शाळेतील शिक्षकांना साठ हजार ते दीड लाखापर्यंत पगार असतो. मी आता दर्जेदार शिक्षणासाठी मोहीम हातात घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. हे माझे मत आहे. त्यासाठी मी कायदेशीरपणे घटनेच्या चौकटीत प्रयत्न करणार आहे. वेळ प्रसंगी शिक्षकावर कठोर कारवाई करायला शासनाला भाग पडणार आहे, असे प्रशांत बंब यांनी म्हटले आहे.
मी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेणार आहे. दर्जेदार शिक्षणासाठी पाऊले उचलतील त्यासाठी जाऊन मी त्यांची भेटणार आहे, असे आमदार बंब यांनी म्हटले आहे. संभाजीनगरमधील पालकमंत्रीपदाबाबत प्रशांत बंब म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चांगला निर्णय घेतील, माझा आग्रह असेल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील तोच पालकमंत्री असावा.