अमरावती : 16 सप्टेंबर 2023 | अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष आमदार बच्चू कडू आणि कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर घणाघाती हल्ला चढविला होता. आमदार यशोमती ठाकूर यांनी निवडणूक काळात कोऱ्या नोटा घेऊन प्रचार केला होता असा आरोप राणा दाम्पत्याने केला. तर, बच्चू कडू यांच्यावरही टीका केली. राणा दाम्पत्याच्या या आरोपानंतर आमदार ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांना 100 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठविण्याचा इशारा दिला. मात्र, हे प्रकरण शांत होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अशातच आता आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर आता एक नवीन आरोप केलाय.
आमदार बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करणार असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याच्या आधारावर सखोल चौकशीची मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभय आहे. त्यामुळेच ते कोणतंही वक्तव्य करतात असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. त्याला आमदार रवी राणा यांनी उत्तर दिलंय.
बच्चू कडू घडी इकडे तर घडी तिकडे असतात. त्यांनी सल्ला देण्याची गरज नाही. निवडणुकीमध्ये हे सर्व नेते माझ्या विरोधात असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुखदुःखत आम्ही सहभागी होतो. आम्ही पळ काढणारे नाही, अशा शब्दात रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल केला.
मला आवर घालण्याचा सल्ला बच्चू कडू यांनी देऊ नये असा टोलाही रवी राणा यांनी लगावला. खरं तर बच्चू कडू यांनाच आता आवर घालण्याची गरज आहे. हे मंत्री पद पाहिजे ते मंत्री पद पाहिजे अशा त्यांच्या अटी असतात. बच्चू कडू हे मंत्रिपदासाठी सरकारला ब्लकमेल करतात, असा आरोपही त्यांनी बच्चू कडू यांच्यावर केला.
आमदार यशोमती ठाकूर यांनी नोटीस पाठविण्याची भाषा केली आहे. पण, त्यांनी खरच नोटीस पाठवावी. यशोमती ठाकूर यांची नोटीस अजून आम्हाला मिळालेली नाही. त्यांची नोटीस आम्हाला मिळाल्या त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.