नागपूर | 20 मार्च 2024 : खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेसाठी महायुतीकडून पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आमदार रवी राणा हे इच्छुक आहेत. यासाठी राणा दाम्पत्याकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावर आनंदराव अडसूळ यांनी दावा केलाय. त्यामुळे महायुतीत अमरावती जागेसाठी रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पण त्यामध्ये अमरावतीच्या जागेचा समावेश नाही. अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी अमरावती विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना विमानतळावर एक चिठ्ठी दिल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. या चिठ्ठीत काय होतं ते गुलदस्त्यात असलं तरी रवी राणा आज रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: रवी राणा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील विकास कामे आणि राजकीय विषयाने मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितलं आहे.
“आम्ही एनडीएचेच घटक आहोत. त्यासाठी भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे अमरावतीच्या जागे संदर्भात निर्णय घेतील. खासदार नवनीत राणा यांनी कोणत्या चिन्हावर आणि कोणत्या पक्षाकडून लढले पाहिजे? एनडीएचे घटक म्हणून लढले पाहिजे की भाजपचे उमेदवार म्हणून लढले पाहिजे, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.
“जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल त्याचं स्वागत केलं जाईल आणि ताकदीने युवा स्वाभिमान पार्टी एनडीएचा घटक पक्ष म्हणून भाजपसोबत उभा राहील. प्रचंड मताने भाजपचा उमेदवार निवडून येईल, असंही रवी राणा यावेळी म्हणाले. आनंद अडसूळ आमच्यासोबतच आहेत. ते माजी खासदार आहेत. अमरावती जिल्ह्याचे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आहेत, आणि मी आधी सांगितले आहे, आम्ही सगळे मिळून एनडीएसोबत आहोत. भाजपचा उमेदवार तिथे उभा राहील. आम्ही सगळे मिळून तिथे काम करू आणि भाजपच्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ”, असं रवी राणा म्हणाले.
“भाजपचा उमेदवार असेल म्हणजे नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करतील असं काही समजा म्हणून मी म्हणत नाही. पण मला असं वाटतं की, फडणवीस स्वतः बोलले आहेत. भाजपची सीट आहे, आणि भाजपचा उमेदवार उभा राहील आणि त्यांनी संकेत सुद्धा दिले आहेत की नवनीत राणा या पूर्ण पाच वर्षे भाजपसोबत राहिल्या. खासदार नवनीत राणांनी एवढ्या ताकदीने भाजपला साथ दिली”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.