राज्यातील राजकारणात बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. हा वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा राजकीय आरोप होत आहे. त्यामुळे विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यासंदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. त्यामुळे प्राजक्ता माळी यांनी मुंबईत शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली. परंतु सुरेश धस यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच प्राजक्ता माळी यांचा निषेध म्हणून आजपासून हास्यजत्रा पाहणार नाही, अशी घोषणा केली.
प्राजक्ता माळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुरेश धस म्हणाले, राज्यात जे आता चालले आहे, त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राजक्ता माळी यांनी माझा निषेध केला आहे. त्यांनी माझे वाक्य परत पहावी. त्यात काहीच आक्षेपार्ह नाही. माझ्या दृष्टिने प्राजक्ता माळी यांचा विषय संपला. राजकारणात त्यांना खेचण्याचा संबंध नाही. त्या माझ्या शत्रू नाही. त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी सुद्धा निषेध म्हणून हास्यजत्रा पाहणे बंद करणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले.
आमदार सुरेस धस यांनी म्हटले की, मी प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही. माणूस आमचा गेला आहे. ज्याचे जळत त्यांना कळते. विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचे आणि कोणाचे संबंध असे बोललो असेल तर संबंध शब्द परत घेतो. मैत्रीतून त्यांनी हे केले असावे. माझी चूक झाली नसल्याने मी माफी मागणार नाही.
प्राजक्ता माळी यांना कोणीतरी पत्रकार परिषद घ्यायला लावली की काय? अशी शंका मला आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले. ते म्हणाले, मला टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे माहिती आहे. राजकारणात कोणाची तरी कोंडी झाली आहे. ती फोडण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आहे.