शरद पवारांच्या आमदाराचे थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज, प्रशासनाच्या दबावानंतर मतपत्रिकेवर उद्या मतदान घेणार

| Updated on: Dec 03, 2024 | 7:29 AM

evm vs ballot paper: अंतरवाली सराटीसारखा पोलिसांनी लाठी चार्ज गोळीबार केला तरीही आम्ही मागे हटणार नाही. पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज तसेच गोळीबारात जखमी झालो तरीही जखमी होऊन ग्रामस्थ मतदान प्रक्रियेत सहभाग होतील, असे उत्तम जानकर यांनी म्हटले.

शरद पवारांच्या आमदाराचे थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज, प्रशासनाच्या दबावानंतर मतपत्रिकेवर उद्या मतदान घेणार
Follow us on

MLA Uttam Jankar: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. त्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे. राज्यातील आंदोलनाची दखल घेऊन निवडणूक आयोगाने काँग्रेससह विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मतदानास प्रशासनाचा विरोध आहे. गावात कलम १४४ लागू केले आहे. त्यानंतरही मतदान घेणारच असल्याचे उत्तम जानकर यांनी म्हटले आहे.

काय म्हणतात आमदार उत्तम जानकर

माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तमराव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. परंतु ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरु केले. त्यांनी गावात बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान करण्याचा निर्णय घेतला. ३ डिसेंबर रोजी हे मतदान होणार आहे. परंतु त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यावर बोलताना उत्तम जानकर म्हणाले, प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जमावबंदी आदेश लागू असला तरीही माघार घेणार नाही. कितीही गुन्हे दाखल झाले तरीही उद्या मतदान प्रक्रिया होणारच आहे.

गोळीबार केला तरीही आम्ही मागे हटणार नाही

अंतरवाली सराटीसारखा पोलिसांनी लाठी चार्ज गोळीबार केला तरीही आम्ही मागे हटणार नाही. पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज तसेच गोळीबारात जखमी झालो तरीही जखमी होऊन ग्रामस्थ मतदान प्रक्रियेत सहभाग होतील, असे उत्तम जानकर यांनी म्हटले. पोलिसांना गुन्हे दाखल करायचे असतील तर पहिला गुन्हा माझ्यावरती करावा नंतर ग्रामस्थांवर करावा. ग्रामस्थांच्या प्रत्येक निर्णयात मी सहभागी असणार आहे. लोकशाही मार्गाने चाललेल्या या प्रक्रियेला प्रशासनाने सहकार्य करायचे सोडून धास्ती का घेतली असा सवाल नूतन आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

गावात जमावबंदी लागू

मारकडवाडी गावात प्रशासनाने आजपासून जमावबंदी लागू केली आहे. पुढील तीन दिवस जमावबंदी लागू असणार आहे. ईव्हीएम विरोधात मतपत्रिकेवर ग्रामस्थ मतदान घेणार होते. दरम्यान या निर्णयावर गावात दोन गट झाले आहे. जानकर यांच्या मर्जीतील चार पुढार्‍यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता हा मतदानाचा निर्णय घेतला आहे, असा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे.