आतली बातमी, राज ठाकरे आणि अमित शाह यांची रात्री 11 वाजता बैठक, मोठ्या हालचाली

| Updated on: Mar 18, 2024 | 8:57 PM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात आज रात्री 11 वाजता बैठक पार पडणार आहे. अमित शाह यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. मनसे-भाजप युतीसाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे.

आतली बातमी, राज ठाकरे आणि अमित शाह यांची रात्री 11 वाजता बैठक, मोठ्या हालचाली
amit shah and raj thackeray
Follow us on

मुंबई | 18 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सध्या प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. मनसे आणि भाजप यांच्यात युतीसाठी या हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सध्या दिल्लीत ठाण मांडून आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची दिल्लीत बैठक पार पडत आहे. विविध राज्यांच्या कोअर कमिटीची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडत आहे. या बैठकींचं सत्र सुरु असतानाच आता राज्यातील भाजप नेत्यांकडून मोठं राजकीय समीकरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. हे समीकरण म्हणजे राज ठाकरे यांना युतीत सहभागी करुन घेणं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात आज रात्री 11 वाजता बैठक पार पडणार आहे. अमित शाह यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत आतापर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपकडून महाराष्ट्रात एकूण 20 जागांसाठी उमेदवार जाहीर झाले आहेत. पण तरीही शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. तसेच राज ठाकरे यांना युतीत सहभागी करुन घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून घडामोडी सुरु होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच त्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर आज प्रत्यक्ष मनसे-भाजप युतीसाठी हालचाली घडताना दिसत आहेत.

राज ठाकरेंना सोबत घेतल्याने महायुतीला काय फायदा होणार?

राज ठाकरे हे प्रभावशाली नेते आहेत. ते त्यांच्या आक्रमक भाषणामुळे जास्त लोकप्रिय आहेत. राज ठाकरे अत्यंत प्रभावीपणे भाषण करतात. तसेच तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची भाजपसोबत युती झाली तर महायुतीला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधू शकतात. तसं झालं तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाबद्दल काही ठिकाणी नागरिकांमध्ये असलेली सहानुभूती कमी करण्यात महायुतीला यश मिळू शकतं.

मनसेला काय फायदा होणार?

दुसरीकडे राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर ते राज्यात थेट सत्तेत सहभागी होणार आहे. सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या पक्षात नव्याने उभारी येऊ शकते. याशिवाय त्यांच्यासाठी लोकसभेच्या एक-दोन जागा सोडल्या आणि त्या जागेवर त्यांचा एखादा उमेदवार जिंकून आला तर तो मनसे पक्षाचा पहिला खासदार असू शकतो. याची नोंद इतिहास लिहिली जाऊ शकते. राज ठाकरे यांच्याकडे स्थानिक पातळीवरच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पाठबळ चांगलं आहे. त्यांच्या स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना भिडायला तयार असतात. त्यामुळे महायुतीत मनसे पक्ष सहभागी झाला तर मनसेसाठी ती पर्वणी ठरु शकते.

बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतून लढणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप मनसेसाठी दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास तयार आहे. तसेच या जागेवर मनसे बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्याचा तयारीत असल्याची देखील माहिती मिळत आहे. ही युती झाली तर राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. त्यामुळे अनेक मित्र पक्ष भाजप जमवण्याचा प्रयत्न करत आहे. मनसे हा महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष आहे. या पक्षाची राज्यात वेगळी ओळख आहे.