मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाविरोधात भूमिका घेतली आहे. शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपणं राज ठाकरे यांना मान्य नाहीय. त्यांनी शिक्षकांना मोठ आवाहन केलं आहे. “माझ्याकडे आता शारादश्रम महाविद्यालयाचे पालक आले होते. त्यांच्या शाळेला नोटीस आली. 1 ते 4 च्या शिक्षकांना निवडणूक आयोगाने बोलवून घेतलय. किती काळासाठी मर्यादा दिलेली नाही. मुलांना शिकवणार कोण? याची कुठलीही व्यवस्था नाही. आता हाती पेपर आलाय, त्याच्यानुसार मुंबई महापालिकेने 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावलय. एवढ शिक्षक बाहेर गेले, तर मुलांना शिकवणार कोण? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय.
निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतो? निवडणुकीच्या कामासाठी अन्य लोकं का तयार करत नाही? आयत्यावेळी शाळांवर दडपण का आणता? निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का नको? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला. अचानक निवडणूका आल्या का? निवडणूक येणार हे माहित नव्हतं का? तुमची यंत्रणा तयार नको का? दरवेळी नवीन काहीतरी बाहेर काढयच, वाद निर्माण करायचा, याची काही गरज आहे का? यात मुलांचा काय दोष? शिक्षक निवडणुकीची काम करण्यासाठी आले आहेत का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी विचारले.
राज ठाकरेंची आव्हानाची भाषा
“माझे लोक निवडणूक आयोगाशी बोलतील. त्यांनी शिक्षकांना निवडणूक आयोगाचा आदेश न मानण्याच आवाहन केलं. “माझी शिक्षकांना विनंती आहे की, त्यांनी कुठेही रुजू होऊ नये. निवडणुकांची काम करणं ही शिक्षकांची काम नाहीत. नवीन लोक आयोगाने तयार करावेत. शिक्षकांनी रुजू होऊ नये. मला बघायचय कोण शिस्तभंगाची कारवाई करतं?” असं राज ठाकरे म्हणाले.