मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा पडद्यामागे काय-काय घडामोडी घडल्या याबाबत राज ठाकरे यांनी नवीन दावे केले आहेत. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. या तीनही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाच्या आधारवर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. हे सरकार स्थापन करण्यासाठी तत्कालीन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष मुलाखतीत केला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना मविआचं सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री करणार, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
“काँग्रेससोबत जाण्यासाठी सर्व गोष्टी एकनाथ शिंदे यांना करायला सांगितल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे त्यांना सांगितलं होतं. नंतर स्वत: बसले. जे केलं ते स्वार्थासाठी केलं. साधी गोष्ट लक्षात घ्या. काँग्रेस एनसीपीच्या विरोधात आजपर्यंत निवडणुका लढवल्या. अचानक उठता आणि त्यांच्यासोबत जाऊन बसता. लोकांनी तुम्हाला भाजप शिवसेना म्हणून मतदान केलं. तुम्ही काँग्रेससोबत जाता ही प्रतारणा नाही का? तुम्ही तटस्थ राहायला हवं होतं”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
राज ठाकरे यांना भाजपची भूमिका आणि आपली भूमिका जवळपास सारखी असल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. “एक गोष्ट आहे त्यात समान बघणार असाल तर ती बाहेर येणार ना. त्यातून वेगळी काय येणार आहे. भाजप माझी भाषा बोलतो असं म्हणा ना. तुम्ही आणि मी या पुतळ्याकडे बघतो. तेव्हा मी म्हटलं अरे शिवाजी महाराज आहे. तुम्ही म्हणाल शिवाजी महाराज आहे. त्याला तुम्ही माझी भाषा बोलता असं म्हणाल का?”, असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला.