मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर मनमोकळेपणाने भूमिका मांडली. शिवसेनेबाबत जे झालं त्याबद्दल वाईट वाटतंय का? असा प्रश्न राज ठाकरेंना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “असं कोणत्याही पक्षासोबत होता कामा नये”, असं म्हटलं. “कोणत्याच पक्षाबाबत या गोष्टी अशा होता कामा नयेत. कारण मी ती गोष्ट केली नाही. मी ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळेस आमदार-खासदार माझ्याकडे आले असताना, मी त्यांना सांगितलं की, पक्ष फोडून मला पक्ष निर्माण करायचा नाही. वेळ लागेल तर लागू देत. मला ती गोष्टच नकोय. त्यापेक्षा सत्ता न आलेली बरी. मी काय कमजोर आहे का? वेळ लागेल. लोकांचा विश्वास संपादीत करेन. लोकं देतील की, एकेदिवशी माझ्या हातात. बाकीच्याही राजकीय पक्षांना वेळ लागलाच ना? शिवसेना, भाजपला पूर्ण हातात सत्ता यायला किती वर्षे गेली?”, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.
“माझा कुणाचा पक्ष फुटण्याला आणि चिन्हाला विरोध नाहीय. मला या प्रोसेसला विरोध आहे. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही 40 आमदार घेऊन गेलात ना? हे फोडाफोडीचं राजकारण मी समजू शकतो. अगदी राष्ट्रवादीचे शरद पवार आपल्या महाराष्ट्रात आहेत की, ज्यांनी अगदी पुलोदपासून ही सर्व सुरुवात केली. फोडाफोडीचं राजकारण मी समजू शकतो. पक्षाचं नाव घेणं, चिन्हं घेणं ही गोष्ट योग्य नाही”, असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी यावेळी मांडलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंदेखील उदाहरण मांडलं.
“अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घेणं, घड्याळ चिन्ह घेणं ही गोष्ट मला वाटतं योग्य नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरेंची कमाई नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची कमाई आहे. त्यांचं अपत्य आहे. त्यांनी कमावलेली ती निशाणी आहे. अशाप्रकारचं राजकारण मला आवडत नाही. आता हे बोलणं काही पाप आहे का?”, असं राज ठाकरे म्हणाले.
“शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली त्यांची स्वत:ची प्रॉपर्टी आहे. ती गोष्ट त्यांना त्यांच्या मुलाला द्यायची असेल तर त्यांनी ती मुलाला द्यावी. माझा कधीही दावा नव्हता. हे मी तुम्हाला कसं समजवून सांगू? मी कुलदैवताची शपथ घेऊन सांगतो. माझ्या मनात हे विचार शिवले देखील नाहीत. अनेकदा बाळासाहेबांना ही गोष्ट सांगून झाली होती. अनेकांचा असं वाटत होतं की, मी त्यावर दावा सांगेन. पण माझ्या मनात तसा विचार कधीच नव्हता”, असा खुलासा राज ठाकरे यांनी केला.
“त्या पक्षात माझा एकच प्रश्न होता की, माझा जॉब काय? निवडणुकीच्या वेळी मी प्रचाराला जाणार आणि परत येऊन नुसता बसणार. हे माझ्याने होणार नाही. त्यापेक्षा मी बाहेर पडतो. त्यासाठी मी 2000 मध्ये बाहेर पडलो होतो. मी कुठल्याच सभा आणि कार्यक्रमाला जात नव्हतो. तुम्ही एकदा तरी माजा स्वभाव समजून घ्या. राजकीय पटलावर ज्या घटना घडतात ते पाहून प्रत्येक माणूस तसाच असतो असं नाही. राज ठाकरे तसा नाहीय. आता तो नाहीय याचे फटके-चटकेही खाल्ले आहेत. पण ते फटके खालल्यामुळे मी तसा वागायला सुरुवात करणार नाही. कारण काही वेळेला सुधरायचं किंवा फुकट जायचं एक वय निघून जातं. तसं माझं फुकट जायचं वय निघून गेलं आहे”, अशी राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.