बदलापुरातील चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेवरुन राज ठाकरे यांचा पोलिसांना सवाल, महाराष्ट्र सैनिकांना महत्त्वाची सूचना

| Updated on: Aug 20, 2024 | 3:45 PM

बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे स्थानकावर ठिय्या देत रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे. गेल्या सात तासांपासून रेल्वे सेवा ठप्प आहे. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत पोलिसांना सवाल केला आहे.

बदलापुरातील चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेवरुन राज ठाकरे यांचा पोलिसांना सवाल, महाराष्ट्र सैनिकांना महत्त्वाची सूचना
बदलापुरातील चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेवरुन राज ठाकरे यांचा पोलिसांना सवाल
Follow us on

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शहरांपैकी एक शहर असं ख्याती असलेल्या बदलापुरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बदलापुरात नामांकीत असलेल्या एका शाळेत अवध्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित शाळेतील एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं आहे. संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास उशिर केल्याचा आरोप केला जातोय. मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा दावा केला जातोय. याच घटनेप्रकरणी बदलापूरकरांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी नराधमावर कठोरात कठोर आणि तात्काळ कारवाई व्हावी यासाठी बदलापूरचे नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे स्थानकावर ठिय्या देत रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे. गेल्या सात तासांपासून रेल्वे सेवा ठप्प आहे. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत पोलिसांना सवाल केला आहे.

“बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या”, अशी सूचना राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

पोलिसांच्या विनवण्या, आंदोलक ऐकेनात

गेल्या सात तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानक आंदोलकांनी भरगच्च भरलं आहे. आरोपीला आमच्या हातात द्या, नाहीतर त्याला तातडीने फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आंदोलकांनी सात तासांपासून रेल्वे वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर पडला आहे. कल्याण-कर्जत दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंदोलक आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीयत. पोलिसांकडून आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनवणी केली जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलं जात आहे. पण आंदोलक आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नाहीत.

विशेष म्हणजे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्जचा पर्याय अवलंबण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. कारण आंदोलक रेल्वे रुळावर मोठ्या संख्येने उभे असल्यामुळे आंदोलकांनी रेल्वे रुळावरील मोठी दगडं पोलिसांच्या दिशेला भिरकावली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करता आला नाही. यानंतर पोलिसांकडून अत्यंत सामंजस्याने आंदोलकांना विनवण्या केल्या जात आहेत. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.