उद्धव ठाकरेंच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे यांची उपस्थिती, रश्मी ठाकरेंनी केलं स्वागत

| Updated on: Dec 15, 2024 | 3:56 PM

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंमध्ये असलेलं वितुष्ट हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यात अनेकदा दोन्ही बंधू एकत्र येतील, अशी चर्चाही होते. पण ते अजूनही प्रत्यक्षात बघायला मिळालेलं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे यांची उपस्थिती, रश्मी ठाकरेंनी केलं स्वागत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमी चर्चेत येणारा मुद्दा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येतील का? शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असं दोन्ही पक्षांच्या समर्थकांना वाटतं. दोन्ही बंधू राजकारणात एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय रचला जाऊ शकतो. नवं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकतं, अशी नेहमी चर्चा होत असते. पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यापेक्षा लांब राहणं जास्त पसंत केलेलं बघायला मिळालं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या बाजूने अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा इतिहास आहे. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून आवश्यक प्रतिसाद मिळालेला याआधी बघायला मिळालेलं नाही. पण यावेळी तसं नाही. उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं आहे. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत.

विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे हे एकमेकांना जोरदार टीका करताना बघायला मिळाले. मात्र कौटुंबिक सोहळ्याला ठाकरे बंधूंची उपस्थिती बघायला मिळाली. माहीममधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात होते. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तिथे उमेदवार दिला होता. यावरुन मनसेकडून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही ठाकरे भावांमध्ये या वितुष्ट आल्याचं बघायला मिळालं होतं. पण या कौटुंबिक सोहळ्यात राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. तर रश्मी ठाकरे यांनी स्वत: राज ठाकरे यांचं स्वागत केलं आहे.

‘त्यावेळी’ राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळेच राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. राज ठाकरे यांनी स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाने नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्या पक्षाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. राज ठाकरे यांचा झंझावात राज्यभरात बघायला मिळाला होता. त्यामुळे पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते. पण नंतर गोष्टी बदलत गेल्या. असं असलं तरीही एकदा उद्धव ठाकरे यांची प्रकृती बघिडली होती तेव्हा राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेले होते. उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी कार चालवत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण हे दोन्ही बंधू अनेक वर्षांपासून राजकारणात एकत्र आलेले बघायला मिळाले नाहीत.