महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे महिलांवर होणाऱ्या अत्याचारापासून, महाराष्ट्रातील जातीयवादी राजकारणांच्या विषयावर बोलले. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचही राज ठाकरेंनी सांगितलं. “महाराष्ट्रात जातीयवादी राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून झाली” अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली.
“1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतरचा महाराष्ट्र बघा आणि त्याआधीचा महाराष्ट्रा बघा. महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती. कधी आमच्या संतांची विभागणी आडनावांमध्ये झाली नव्हती. जातीमध्ये बघितल जात नव्हतं. संतांकडे संत म्हणून पाहिल जात होतं. या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर” असा आरोप राज ठाकरे यांनी केला. “याआधी महाराष्ट्र असा कधी नव्हता. जे जातीय विष पसरवल गेलं, त्याची सुरुवात 99 पासून झाली” असं राज ठाकरे म्हणाले.
‘हे राजकारण विधानसभा, लोकसभेपुरता नाहीय’
भाजपा आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकतोय असं वाटतं का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “कस होतं प्रत्येकाला राजकारण करायचं आहे. जे चालतय नाणं ते चालवून घ्या. पण मला अस वाटत की, सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे. हे राजकारण विधानसभा, लोकसभेपुरता नाहीय. घराघरात शिरलेला हा विषय आहे. असलं घाणरेड वातावरण याआधी महाराष्ट्रात कधी नव्हतं. हे सगळ सुरु झालं, राष्ट्रवादीच्या जन्मापासून” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना का भेटणार?
राज ठाकरे यांनी यावेळी मीडियाशी बोलताना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लवकरच भेटणार असल्याच राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून देशात NDA आणि महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा दिला होता. विधानसभेला मात्र मनसे एकला चलो रे असून पक्ष 200 ते 225 जागांवर निवडणूक लढणार आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं.