आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कामाला लागला आहे. मनसेची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होऊ शकली नाही, याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मनसे आणि भाजपची युती होऊ शकली नाही, अशी खंत मनसेच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे शक्य झालं नाही ते आगामी काळात शक्य होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मनसे आणि भाजप यांच्या युतीचे स्पष्ट संकेत मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिले आहेत.
“विधानसभेला आम्ही एकटे लढलो. तीन-तीन पक्ष आमच्या विरोधात लढले. 30, 40, 70 हजार मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीला एकट्या मनसेला मिळाले होते. तीन पक्ष मिळून भेटले आहेत”, असं अविनाश जाधव म्हणाले.
“प्रभागात आणि वार्डात आमची जी काही ताकद आहे ती दिसून आलेली आहे. मनसे आणि भाजप युती झाली तर आम्ही त्याचे स्वागतच करू. आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे”, असं मोठं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलं. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रातील मोठे नाव आहे. त्यांना भेटायला अनेक जण जातात. भाजप आणि मनसे एकत्रित आले तर भाजपची ताकद वाढेल. आमची देखील ताकद वाढेल”, असंही अविनाश जाधव म्हणाले. दरम्यान, मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आपण नव्हतो, असंही अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं.
यावेळी अविनाश जाधव यांनी माजी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “शिवसेना संपवण्याचं पाप सर्वात जास्त कोणी काय केलं असेल ते म्हणजे संजय राऊत. बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाज काढण्याचा प्रकार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांना मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता बसवण्याची घाई आहे”, अशी टीका अविनाश जाधव यांनी केला. “संजय राऊत शिवसेना पक्ष घेऊन डुबतील. त्यांनी आमचा विचार करू नये”, असाही टोला अविनाश जाधव यांनी लगावला.
यावेळी महापालिकेचा महापौर कोण होणार? या प्रश्नावर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही लढत आहोत. महापौर कोणाचा बसेल ही वेळ ठरवेल. चारसो पार हे जसं अंगाशी आलं होतं तसं महापौर हे अंगाशी येऊ देऊ नये ही विनंती”, असं अविनाश जाधव म्हणाले. यावेळी अविनाश जाधव यांना लाडक्या बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना सक्षम करा. लोन द्या. त्यांना सक्षम करा. पैसे देऊन त्यांना हतबल करू नका”, असं अविनाश जाधव म्हणाले.
राज्य सरकारने फास्ट ट्रॅकबाबत घेतलेल्या निर्णयावरही अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. “मुंबईचे एन्ट्री पॉईंट मोकळे झाले आहेत. जर मोठ्या रोडने प्रवास करायचा असेल समृद्धी एक्स्प्रेसने जर प्रवास करायचा असेल तर तुमचं पेट्रोल, इंधन असतं. तुमचा वेळ वाचतो. त्यातील थोडेसे पैसे सरकारला दिले गेले पाहिजे. टोल द्यावाच लागेल”, असं अविनाश जाधव म्हणाले.
बीड सरपंच हत्या प्रकरणातील पीडित देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी राज ठाकरे जाणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. “संतोष देशमुख कुटुंबाच्या सोबत मनसे आहे. नजीकच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या कुटुंबाला भेट देतील”, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.