महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला खातं देखील उघडता आलेलं नाही. या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघात निवडणूक लढवत होते. पण त्यांचादेखील या मतदारसंघात पराभव झाला. ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा या निवडणुकीत विजय झाला. या निकालानंतर आता मनसेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाच्या आयुष्यात असे चढउतार येत असतात. पक्ष काम हे असं चालू राहिलं तर कार्यकर्ता पुढे येऊ शकतो, पक्ष पुढे येईल. तसेच कुठलाही चढ आणि उतार हा फार काळ टिकत नसतो. आमच्याही पक्षाचा चढ येईल असा मला विश्वास आहे. आमचा पक्ष कठीण काळातही उभा राहील आणि उभारी घेईल असा मला विश्वास आहे”, असं प्रकाश महाजन म्हणाले.
“या निवडणुकीत स्वतः राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मुंबईकरांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की जे मुंबईकर टोल फ्री मुंबईत येतात ते केवळ राज ठाकरे यांच्यामुळे झालं आहे. आम्ही आंदोलन करतो, न्याय देतो. पण जनता…तरीही आम्ही काम करणं सोडणार नाहीत. असे अनेक आंदोलन आम्ही करू. भाजपच्या पाठिंब्यावर संशय घ्यावा अशी परिस्थिती आहे. शिवडीत बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार आहेत, अशी परिस्थिती होती. इतर ठिकाणी भाजप आणि संघाने अजितदादांच्या उमेदवाराला मदत केली. मग आमच्या उमेदवारांना केली की नाही? किती मदत केली? हा प्रश्नच आहे”, अशी शंका प्रकाश महाजन यांनी उपस्थित केली.
“भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांचा प्रचार केला नाही. त्यांनी शब्द मोडला आहे. आम्ही दिलेला शब्द मोडला नाही. लोकसभेत आम्ही हिरीरीने त्यांचं काम केलं. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे यासाठी आम्ही काम केलं. महायुतीच्या नेत्यांचे अभिनंदन करतो यश हे यश असतं. भाजपने विशेषतः संघाने यामध्ये खूप काम केलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं काम केलं. भाजपने मौलाना नोमानीचा फोटो भाजप कार्यालयात लावला पाहिजे. नोमाणीने यादी जाहीर केली होती. त्यातील उमेदवारांना वेचून वेचून पाडलेलं आहे. त्यामुळे कौतुक आहे की हिंदू जागा झाल्यामुळे काय करू शकतो”, असं प्रकाश महाजन म्हणाले.
यावेळी प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “त्यांच्या अस्तितावर प्रश्न उभा राहिला, तेव्हा इतरांच्या आधाराची गरज वाटू लागली. असे अनेक प्रयत्न झाले ते का यशस्वी झाले नाहीत? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यायचे असतील तर त्यांना कोणी रोखू शकत नाही. ते कोणी सांगून येतील असं वाटत नाही. आमच्या अनेक नेत्यांकडून प्रयत्न झाले होते. पण आम्हाला प्रत्येक वेळी अंधारात ठेवलं होतं. कोणतीही लढाई अंतिम नसते जोपर्यंत शस्त्र टाकत नाही. राज ठाकरे यांनी शस्त्र खाली टाकलेलं नाही. त्यामुळे लढाई चालू आहे”, असं प्रकाश महाजन म्हणाले.