मुंबई : सर्व जणांच्या पाठीवर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी लगावला आहे. मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्यास सर्वसामान्य जनतेला अद्यापही परवानगी न दिल्यावरुन देशपांडेंनी ठाकरे सरकारला ट्विटरवरुन चिमटे काढले आहेत.
“सीएम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत, बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करु शकता, आमचा सीएम जगात भारी” असे खोचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते.आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 3, 2021
मनसेचा रेलभरो आंदोलनाचा इशारा
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसेला रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं.
निर्बंधांमध्ये शिथिलता
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 22 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध कायम राहणार आहेत. नव्या नियमानुसार 22 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. सरकारच्या या नियमावलीमध्ये मुंबई लोकल रेल्वेचा कुठेही उल्लेख नाही.
संबंधित बातम्या :
कोरोना निर्बंधांबाबत राज्य सरकारची नवी नियमावली, काय सुरु काय बंद राहणार? वाचा सविस्तर
(MNS Leader Sandeep Deshpande taunts CM Uddhav Thackeray asks to give Shiv Pankh for not allowing travel by Mumbai Local)