नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या संभाजी चौक – सिटी सेंटर मॉल – त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलाला मनसेने विरोध केला आहे. त्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांचीही पदाधिकाऱ्यांनी भेट घेत या प्रकरणी प्रसंगी कोर्टात जाण्याचाही इशारा दिलाय.
नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होत आहे. मनसेने ही निवडणूक स्वबळावर आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, मनसे आक्रमक होताना दिसतेय. मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीही नुकताच नाशिक दौरा केला होता. त्यात पक्षाच्या कार्यकारिणीत अनेक फेरबदल करून निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत निवडणुकीची जोरात तयारी सुरू केलीय. नाशिकमध्ये संभीज चौक – सिटी सेंटर मॉल – त्रिमूर्ती चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणारय. या कामाला मनसेने विरोध केला आहे. त्यासाठी आज शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या कामाला स्थानिक, व्यावसायिकांचा विरोध आहे. या कामामुळे चक्क 300 कोटींची उधळपट्टी होईल. हे काम करू नये, असे साकडे पालकमंत्र्यांना घातले. भुजबळ यांनी याप्रकरणी चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्याउपरही हे काम झाले, तर न्यायालयीन लढाई लढू, वेळेप्रसंगी रक्त सांडू, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिला आहे.
राजकीय पक्ष जोरात
महापालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनेही जोरात तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः राज ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नाशिकचा दौरा करत कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर येते. सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे पाहायला दिसते आहे.
नाशिकमध्ये पुन्हा उड्डाणपूल उभारणे म्हणजे चक्क तीनशे कोटींची उधळपट्टी होईल. या कामाला स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध आहे. ही भावना लक्षात घेता हे काम करू नये. अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार आहोत. वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करू. त्यासाठी रक्त सांडू. मात्र, हे काम होऊ देणार नाही.
– दिलीप दातीर, शहराध्यक्ष, मनसे
इतर बातम्याः
Mumbai | तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका – tv9 #aryankhan | #aryankhanbail |#shahrukhkhan pic.twitter.com/8NpaNLnPYC
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021