मनसेचा औरंगाबादेत राडा, चंद्रकांत खैरेंची गाडी अडवली; घेराव घालून विचारला जाब

| Updated on: Feb 04, 2021 | 4:48 PM

केकाळी मंत्र्यांच्या गाड्या अडवणाऱ्या शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या गाड्या आता मनसेने अडवायला सुरुवात केली आहे. (mns protest for rename of aurangabad against shivsena)

मनसेचा औरंगाबादेत राडा, चंद्रकांत खैरेंची गाडी अडवली; घेराव घालून विचारला जाब
Follow us on

औरंगाबाद: एकेकाळी मंत्र्यांच्या गाड्या अडवणाऱ्या शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या गाड्या आता मनसेने अडवायला सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून आज मनसेने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. त्यांना जाब विचारला आणि त्यांच्या अंगावर पत्रकं फेकून जोरदार घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मनसेने राडा केला आहे. त्यामुळे औरंगाबादेत मनसेचं बळ वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (mns protest for rename of aurangabad against shivsena)

औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ असं करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांती चौकातून जाणार असल्याचं कळल्यानंतर शेकडो मनसेसैनिक हातात झेंडे घेऊन क्रांती चौकात दाखल झाले. मनसे सैनिकांनी खैरे यांची गाडी येताच त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरजोरात घोषणाबाजी सुरू करण्यात आली. त्यामुळे खैरे यांना गाडीच्या बाहेर यावं लागलं. यावेळी खैरे यांनी मनसे सैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक मनसे सैनिकांनी जोरजोरात घोषणाबाजी करत औरंगाबादचं नामांतर का होत नाही? असा जाब खैरे यांना विचारला. त्याचवेळी मनसे सैनिकांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रकं खैरे यांच्या अंगावर फेकून दिली. यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि ‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या खैरेंना गप्प उभं राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

नामांतराचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल

यावेळी खैरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न लवकर मार्गी लागेल असं स्पष्ट केलं. औरंगाबादच्या नामांतराबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे हा निर्णय लवकर होईल, असं खैरे म्हणाले. तसेच मनसेच्या या प्लानिंगची मला माहिती नव्हती. आम्हाला माहिती असती तर आम्हालाही प्लान आखता आला असता, असं ते म्हणाले.

बाळासाहेबांच्या इच्छेचं काय?

औरंगाबादचं नामांतर करणं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच इच्छा होती. त्यामुळे शिवसेनेने बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच रस्त्यावर उतरलो आहोत, असं मनसे सैनिकांनी सांगितलं. (mns protest for rename of aurangabad against shivsena)

 

संबंधित बातम्या:

दिवंगत पतीच्या पराभवाचा रक्षा खडसेंकडून वचपा, खडसे-जैन कुटुंबातील राजकीय वैमनस्य काय होतं?

कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही; आंबेडकर आक्रमक

अजित पवारांची विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमचं इंदापूरमध्ये जाहीर सभा; राजकीय वातावरण तापलं

(mns protest for rename of aurangabad against shivsena)