मुंबई: राज्यातील अकरावी प्रवेशाचा रखडलेला प्रश्न उद्यापर्यंत सुटण्याची शक्यता आहे. आज विद्यार्थी आणि पालकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी थेट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावला असता आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं त्यांनी राज यांना सांगितलं. त्यामुळे हा प्रश्न उद्यापर्यंत मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (MNS Raj thackeray talk with varsha gaikwad for 11th admission issue)
राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अकरावीसह इतर इयत्तांचे प्रवेश रखडले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे कोचिंग क्लास मालकांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर आज पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. यावेळी राज ठाकरे यांनी कोचिंग क्लास चालक आणि पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं निवेदनही स्वीकारलं. या मागण्या सरकार दरबारी मांडा, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे मांडली. त्यानंतर थेट पालकांसमोरच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावून अकरावी प्रवेशाची समस्या मांडली. यावेळी आज संध्याकाळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आमची चर्चा आज संध्याकाळी होणार आहे. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला त्याबाबतची माहिती देते, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यावर राज यांनी अकरावी प्रवेशाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असं गायकवाड यांना सांगितलं.
गायकवाड यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राज यांनी पालकांना चर्चेचा तपशील सांगितला. दरम्यान, राज आणि गायकवाड यांच्यात या विषयावर पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. वर्षा गायकवाड यांनी राज यांना दिलेल्या आश्वासनामुळे अकरावी प्रवेशाचा तिढा उद्यापर्यंत सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (MNS Raj thackeray talk with varsha gaikwad for 11th admission issue)
यावेळी पालक संघटनांनी राज यांच्याकडे इयत्ता 12 वीच्या परीक्षा फेब्रुवारीत होणार असल्याचं सांगितलं. मुलांचा ऑनलाइन अभ्यास म्हणावा तसा झालेला नाही. सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने अनेकांना ऑनलाइन क्लासचा फायदा झालेला नाही, याकडेही पालकांनी राज यांचं लक्ष वेधलं.
पालक संघटना राज ठाकरेंच्या भेटीला https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/WkhjamdcCV
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
संबंधित बातम्या:
आधी कोचिंग क्लासेसच्या शिष्टमंडळाशी बैठक, नंतर राज ठाकरेंचा थेट वर्षा गायकवाड यांना फोन
Raj And Amit Thackeray Tennis | ‘राज’पुत्राचा एकत्र टेनिसचा डाव!
(MNS Raj thackeray talk with varsha gaikwad for 11th admission issue)