मुंबई : दोन दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्या नाशिक-नगर दौऱ्यादरम्यान मोठा राडा झाला होता. सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता. टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाला, म्हणून टोल नाका फोडला असं मनसे कार्यकर्त्यांच म्हणण होतं. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धातास तिष्ठत ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला होता.
मनसैनिकांनी केलेल्या या तोडफोडीवर आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. भाजपाने थेट अमित ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.
‘कधीतरी बांधायलाही शिका’
महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे विरुद्ध भाजपा असा एक नवीन सामना पाहायला मिळू शकतो. “अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा” असा टोला भाजपाने लगावला आहे. भाजपाने एक व्हिडिओ पोस्ट करुन अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजपाने अमित ठाकरेंबद्दल काय म्हटलय?
भाजपाने व्हिडिओमधून अमित ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिटं थांबवली असं भाजपाने म्हटलय. टोल नाका फोडल्याच समजल्यानंतर अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला असं भाजपाने म्हटलय. त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर खोट बोलण्याचाही आरोप केलाय. अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडायला भाग पाडलं, असं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
भाजपाला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का ?
दरम्यान आता मनसेनेही भाजपाच्या या व्हिडिओला प्रत्युत्तर दिलं आहे. “मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपाला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का ?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या #भाजपामहाराष्ट्र ला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का ? https://t.co/AyyX0jiilR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2023
अमित ठाकरे काय म्हणाले होते?
“टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. “मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला” असं अमित ठाकरे म्हणाले.