मुंबई : सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्ग टोल नाका तोडफोडीवरुन मनसे आणि भाजपामध्ये शाब्दीक द्वंद सुरु आहे. भाजपाने खास व्हिडिओ पोस्ट करुन अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्याला मनसेकडूनही उत्तर देण्यात आलं. सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका दोन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा टोल नाक्यावर अपमान झाला, म्हणून समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं.
मनसेच्या या कृतीला भाजपाने प्रत्युत्तर दिलं. दादागिरी सहन करणार नाही, असं महाराष्ट्र भाजपाने म्हटलं आहे. टोल नाक्यावर फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिट थांबवण्यात आली होती. अमित ठाकरे खोट बोलतायत, असा भाजपाचा आरोप आहे.
काय आरोप केलेत?
टोल नाका फोडल्याच समजल्यानंतर अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडायला भाग पाडलं असे आरोप भाजपाने केले. त्यावर आता स्वत:हा अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
मनविसे अध्यक्ष श्री. अमित ठाकरेंचं हेच विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय.
आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ?… pic.twitter.com/LrAr4inpUR
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 25, 2023
महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ?
“पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय. कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल, तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत?” असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारलाय.
अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून शपथविधी कसे घेतले जातात?
“बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत” अशी बोचरी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे.