राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये चांगला जलसाठा झाला. परंतु त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यातील बहुतांश भागात आजपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. किनारपट्टी, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोव्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या दिशेने बाष्पयुक्त हवा वेगाने येत आहे. किनारपट्टी, घाटमाथा आणि घाटमाथ्याला लागून असलेल्या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आजपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर जास्त राहणार आहे.बांगलादेशावर हवेच्या कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच आज, २३ ऑगस्ट रोजी बंगालच्या खाडीत आणखी एक हवेची चक्रीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पूर्व विदर्भ, उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
हवामान विभागाने मुंबईत गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, गुरुवारी संपूर्ण दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्याने मुंबईकरांची काहिली झाली. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईत ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसासंदर्भात व्यक्त केलेले सर्व अंदाज फोल ठरले आहेत. मुंबईत यंदा मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला. जुलै महिन्यात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस पडलाच नाही. त्यानंतर पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र सगळे अंदाज फोल ठरवत पावसाने दडी मारली आहे.
दरम्यान, राज्यात तापमान वाढले असून, पारा सरासरी ३२ अंश सेल्सिअसवर गेला आहे. विदर्भात ब्रह्मपुरीत सर्वाधिक ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यामुळे उकाड्यातून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.