उन्हामुळे घामांच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना गारवा देणारी बातमी आली आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सूनची अंदमानमधील वाटचाल वेगाने सुरु आहे. अंदामानमध्ये मान्सून 19 मे पर्यंत दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. आता हवामान विभागाने मान्सूनच्या पुढील प्रगतीचा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सून यंदा केरळमध्ये वेळेआधीच दाखल होणार आहे. यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी मान्सून 4 जूनला केरळात दाखल होण्याचा अंदाज होतो. परंतु त्याची वाटचाल लांबली होती. गेल्या वर्षी 8 जूनला मान्सून केरळमध्ये आला होता. यापूर्वी 2022 मध्ये 29 मे 2021 मध्ये 3 जून 2020 मध्ये 1 जून तर 2019 मध्ये 8 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.
मागील वर्षी एल निनोचा प्रभाव मान्सूनवर होता. तो यंदा कमकुवत झाला आहे. भारतीय उपसागरात आता ला निनो सक्रीय झाला आहे. यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. यापूर्वीच हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे मागील वर्षी दुष्काळाच्या फटका बसलेल्या भारताला यंदा फायदा होणार आहे.
2024 SW Monsoon over Kerala Forecast by IMD:
2024 नैऋत्य मान्सून, 31 मे 2024 रोजी केरळमध्ये येण्याची शक्यता. (मॉडेल त्रुटी +/- 4 दिवसांच्या) pic.twitter.com/37q1mjyoH9
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2024
भारतीय हद्दीत असणाऱ्या हिंद महासागरात मान्सूनला अनुकूल बदल होत आहे. आता हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाचा पट्टा मान्सूनसाठी अनुकूल आहे. यंदा 19 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याचा अंदाज आयएमडीकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पुढील 10 दिवसांत मान्सून केरळमध्ये येणार आहे. म्हणजेच यंदा 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचणार आहे. मान्सून केरळमध्ये आल्यावर त्याची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरु होते. केरळमधून पुढील 4 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने मान्सूनसंदर्भातील पहिली अंदाज मागील महिन्यात व्यक्त केला होतो. त्यानुसार, यंदा १०६ टक्के पाऊस होणार आहे. हा सरासरीपेक्षा जास्त आहे. आता दुसरा अंदाज मे महिन्याच्या शेवटी येणार आहे.
31 मे रोजी मॉन्सून भारताची मुख्य भूमी म्हणजेच केरळमध्ये दाखल होणार आहे. कालांतराने पुढील काही दिवसातच तो महाराष्ट्रात बरसणार आहे. परंतु सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरूच राहणार आहे, असे पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे.