Monsoon Trip: पावसाळ्यात लोणावळा, खंडाळ्याला फिरायला जाताय? ही बातमी वाचाच..

| Updated on: Jul 01, 2024 | 2:23 PM

लोणावळ्यातील भुशी डॅमजवळ सहलीसाठी गेलेले एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेतील पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाला काल सापडले.

Monsoon Trip: पावसाळ्यात लोणावळा, खंडाळ्याला फिरायला जाताय? ही बातमी वाचाच..
bhushi dam
Image Credit source: Instagram
Follow us on

पावसाळा सुरू झाला की ‘मान्सून ट्रेक’, ‘मान्सून ट्रिप’ला जाण्याची अनेकांची आवड असते. लोणावळ्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र असलेलं भुशी धरण रविवारी सकाळी भरून वाहू लागलं. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक पावसाळी सहलीसाठी दाखल झाले. लोणावळा परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे डोंगररांगांतील धबधबे प्रवाहित झाले आहेत. रविवारी भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं. धरण परिसरात पुणे-मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून पर्यटक येतात. अशातच धरणाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात चार ते पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेनंतर लोणावळा पोलिसांनी पर्यटकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. लोणावळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी लोणावळा आणि खंडाळा भागात ‘मान्सून ट्रिप’साठी येणाऱ्या पर्यटकांना अनोळखी परिसरात जाऊन आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन केलं आहे.

विशेषत: भुशी धरण, घुबड तलाव, टाटा धरण, तुंगार्ली धरण, राजमाची पॉईंट यांसारख्या भागात पोलिसांना सहकार्य करण्यास त्यांनी सांगितलं आहे. धरम वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे धरण परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी विचारात घेऊन अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचसोबत हुल्लडबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे.

पर्यटकांनी या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात:

  • अपरिचित ठिकाणांना भेट देताना आधी तिथली माहिती गोळा करा किंवा तिथे जाताना जाणकार मार्गदर्शक सोबत घ्या.
  • फर्स्ट-एड बॉक्स (प्रथमोपचार पेटी) आपल्याजवळ ठेवा.
  • हवामानाच्या अंदाजानुसार ट्रेकचं नियोजन करा.
  • पाण्याच्या थेट प्रवाहात जाणं टाळा.
  • मद्यसेवन करू नका.
  • रेस्क्यु टीम, पोलीस आणि स्थानिकांचे संपर्क क्रमांक आपल्याजवळ ठेवा.
  • धुकं असलेल्या परिस्थितीत सावधगिरी बाळगा.
  • पावसाळ्यात बऱ्याच दगडांवर शेवाळं येतं, त्यामुळे चालताना पाय घसरण्याची शक्यता असते. अशावेळी निसरड्या भागात आणि
  • पायऱ्यांवर काळजीपूर्वक चाला.
  • धोकादायक ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणं टाळा.
  • स्टंट्स करणं, अतिउत्साहीपणे वागणं टाळा.