राज्यात आणि देशात सध्या तापमान प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वांना मान्सूनचे वेध लागले आहे. यंदा मान्सूनची वाटचाल चांगली सुरु आहे. अंदमान निकोबारमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला. १८ मे रोजी अंदामान निकोबारमध्ये मान्सून आल्यानंतर त्याची वाटचाल केरळकडे सुरु झाली. केरळमध्ये मान्सून वेळेआधी आला. १ जून ऐवजी ३० मे रोजी मान्सून आला. त्यानंतर महाराष्ट्रतील कोकणात मान्सूनचे वेध लागले. महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे. मान्सून कोकणात वेळेआधीच दाखल होणार आहे. कोणात मान्सून वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोकण किनारपट्टीवरती मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज आहे. दोन जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार आहे. यंदा मान्सून वेळेआधीच येणार आहे. तसेच सरासरीपेक्षा जास्त कोसळणार आहे. राज्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे.
अरबी समुद्र खवळलेला असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढला आहे. आता समुद्राचा रंग देखील बदलला आहे. समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होते. त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा सुरु आहे. उष्माघातामुळे शुक्रवारी एका दिवसात 4 राज्यांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक 17 जणांना उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये 14, ओडिशामध्ये 5 आणि झारखंडमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 72 तासांत 182 लोकांचा मृत्यू हा उष्णतेच्या लाटेने झाल्याची माहिती देण्यात आली. अयोध्येत 3 दिवसांत 18 बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते, त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचे सांगितले गेले.
शनिवारी देशात कुठेही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पण राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.