जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, आता जुलै महिन्यात बरसणार, IMD चा अंदाज नेमके काय?

| Updated on: Jul 02, 2024 | 9:50 AM

Rainfall In June: मान्सूनवर आता ला-निनोचा प्रभाव दिसणार आहे. प्रशांत महासागरात ला-निनोला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होणार आहे. हिंद महासागरात मान्सूनला अनुकूलबदल दिसून येत आहे.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, आता जुलै महिन्यात बरसणार, IMD चा अंदाज नेमके काय?
rain
Follow us on

देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मागील वर्षी दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर यावर्षी दिलासा मिळण्याचा अंदाज होता. परंतु जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. देशात जून महिन्यात सरासरी 165.3 मिमी पाऊस पडतो. परंतु यंदा 147.2 पावसाची नोंद झाली. जून महिन्यात 2001 नंतर हा सर्वात कमी पाऊस झाला आहे. चार महिन्यांचा मान्सूनमध्ये जून महिन्यात 15 टक्के पाऊस पडतो. यामुळे सर्वाचे डोळे जुलै महिन्याकडे लागले आहे. त्यावेळी हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे.

जुलैत 106 टक्के पाऊस

यंदा मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वी 30 मे रोजी दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्राकडे त्याची दमदार वाटचाल सुरु झाली. परंतु कोकणात आल्यानंतर मान्सूनने दीर्घ ब्रेक घेतला. 11 ते 27 जून दरम्यान देशांत सर्वात कमी पाऊस झाला. जूनमध्ये रुसलेला मान्सून जुलै महिन्यात दमदार बसरणार आहे. हवामान विभागाने सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशात जुलै महिन्यात 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.

हे सुद्धा वाचा

जुलै महिन्याची सरासरी 280.4 मिलिमीटर पावसाची

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यांनी सांगितले की, जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु जुलै महिना पावसाचा असणार आहे. या महिन्यात देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. देशात जुलै महिन्यात 280.4 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापेक्षा जास्त पाऊस यंदा होणार आहे. जुलैमध्ये महाराष्ट्रासह देशातील किनारपट्टीलगत कमाल तापमान वाढणार आहे.

ला-निनोचा प्रभाव दिसणार

मान्सूनवर आता ला-निनोचा प्रभाव दिसणार आहे. प्रशांत महासागरात ला-निनोला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होणार आहे. हिंद महासागरात मान्सूनला अनुकूलबदल दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात मंगळवारी ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, रायगड आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

लोणावळ्यात 24 तासांत 136 मिलीमीटर पावसाचा विक्रम

लोणावळ्यात मागील 24 तासांत 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांतील हा विक्रमी पाऊस आहे. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावले लोणावळ्यात वळू लागली आहेत