औरंगाबादः जन्म ठाणे जिल्ह्यातल्या चिंचणीत, राजकीय कारकीर्द लातूर नगर परिषदेतून सुरू. औरंगाबामध्ये (Aurangabad) महापौर ते दोन वेळा खासदारकी भूषविली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विश्वासू असे ओळख असणारे माजी खासदार मोरेश्वर सावे (Moreshwar Save) यांची आज 14 फेब्रुवारी रोजी जयंती. सावे यांचा जन्म 1931 मध्ये चिंचणी, ठाणे येथे झाला. तर मृत्यू 16 जुलै 2015 रोजी औरंगाबादमध्ये झाला. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून ते बी. कॉम. झाले. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले मोरेश्वर सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. 1988 मध्ये त्यांनी औरंगाबादमध्ये समर्थनगर वॉर्डातून अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचे चिन्ह होते ‘मशाल’. या निवडणुकीत ते विजयी झाले. नंतर सावे शिवसेनेत दाखल झाले. पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर 1989-90 मध्ये त्यांनी महापौरपद भूषविले. त्यानंतर 1989 ते 91 आणि 1991 ते 96 असे सलग दोन वेळेस ते खासदार राहिले.
बाबरी खटल्यात आरोपी
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी प्रमुख आरोपीत माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे नाव होते. सावे यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक प्रमोद माने यांनी सावे यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत चांगलीच गाजली. याबद्दल माहिती देताना ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने म्हणाले की, ‘बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्ववादी संघटना पुढे आली नव्हती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे, असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत औरंगाबादचे खासदार मोरशेवर सावे आणि ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक कारसेवेला गेले होते. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हाही हे शिवसैनिक सहभागी होते. त्या प्रकरणात मोरेश्वर सावे हे प्रमुख आरोपीही होते. मात्र, त्यांची नंतर सुटका झाली. सावे यांनी बाबरी पतनाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. चंबळ खोऱ्यात त्यासाठी बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले होते. या सगळ्यात नियोजनाची बाळासाहेब ठाकरे यांना माहिती दिली जायची. मात्र, त्यांनी कोणाबद्दलही शेवटपर्यंत कधी मनात कटुता बाळगली नाही.’
कडक शिस्तीचा दंडक
माजी खासदार मोरेश्वर सावे कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी महापौर असताना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊ दिला नाही. एक दिवस आधीच ते सदस्यांच्या प्रश्नांची यादी घेत. त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांशिवाय कोणालाही सभागृहात बोलण्याची परवानगी नसे. अवांतर विषयावर बोलण्यासही त्यांनी मनाई केली होती. इतकेच काय, महापौरांच्या दालनात कोणीही केव्हाही यायचे नाही, असाही दंडक त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे काम असेल तरच या, असा थेट कायदाच त्यांच्या काळात होता.
उद्योगासाठी योगदान
मोरेश्वर सावे उद्योग क्षेत्रासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते 1987 ते 1989 या काळात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्षही होते. तर 1985 ते 87 या काळात काळात उपाध्यक्ष होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची शिवसेनेत ओळख होती. मात्र, नंतरच्या काळात त्यांची शिवसेनेशीही जमले नाही. मात्र, शेवटपर्यंत त्यांनी शिस्तीचा कडवा शिवसैनिक हीच ओळख जपली.
हैदराबाद मुक्तिसंग्रामात काम
हैदराबाद मुक्तिसंग्रामातही सावे यांनी भूमिगत राहून काम केले होते. हैदराबाद येथून त्यांनी बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतले. ते औरंगाबादमधील बहुतांश सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित असत. ‘नादब्रह्म’ या सांस्कृतिक संघटनेचे ते अध्यक्ष होते. वेगवेगळ्या संसदीय समित्यांवर त्यांनी प्रतिनिधित्व केले. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या पाठीवर त्यांनी नेहमीच कौतुकाची थाप दिली. सावे यांना अनिल, अजित व अतुल सावे ही तीन मुले आणि अंजली ही त्यांची विवाहित कन्या आहे. सध्या त्यांचा राजकीय वारसा मुलगा आणि आमदार अतुल सावे हे चालवत आहेत.
राजकीय प्रवास
– 1988 – नगरसेवक, औरंगाबाद महानगरपालिका.
– 1989 – 90 : महापौर, औरंगाबाद महानगरपालिका.
– 1989 – 90 : निवड 9 वी लोक सभा (पहिली टर्म).
– 1989 – 1991 : सदस्य, सल्लागार समिती, नागरी विमान मंत्रालय.
– 1991 – निवड 10 वी लोक सभा (दुसरी टर्म).
– 1991 – सदस्य, कृषी समिती.
– 1991 – 91 सदस्य, सल्लागार समिती, उद्योग मंत्रालय.
सामाजिक व सांस्कृतिक कार्य
– स्वातंत्र्य चळवळीत भाग.
– उपाध्यक्ष, तंत्रज्ञान मराठवाडा संस्था, औरंगाबाद.
– उपाध्यक्ष, मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशन, 1985-87.
– अध्यक्ष, मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशन, 1987-89.
– सदस्य , औरंगाबाद शहर वाहतूक सल्लागार समिती.
– सल्लागार सदस्य , कमल नारायण बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद.
– सदस्य, वाहतूक सल्लागार समिती.