निलेश दहाट, चंद्रपूर | दि. 12 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. परंतु या गटबाजीमुळे आपल्या पतीचा जीव गेला. आता दुसरा जीव जाऊ देणार नाही, असा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. पक्षांतर्गत विरोधामुळेच माझे पती खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदारास माहिती आहे, खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, असे प्रतिभा धानोरकर यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.
चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या पत्नी आ. प्रतिभा धानोरकर यांनी धक्कादायक विधान केली आहेत. खासदार साहेब गेलेत तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करीत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव त्यांनी घेतला. पक्षातील लोकांनी खासदार साहेबांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आता ते माझ्या मागे लागलेत. पण एक जीव गेला. दुसरा जीव मी जाऊ देणार नाही, याची काळजी मी घेणार आहे, असे आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
खासदार साहेब गेल्यापासून आठ ते नऊ महिन्यांपासून जे लोक माझा सर्वाधिक विरोध करीत आहेत, तेच लोक मी भाजपात जाणार अशा चुकीच्या अफवा पसरवीत आहेत. त्यासाठी माध्यमांना पॅकेज देऊन चुकीच्या बातम्या पसरवीत आहेत. त्यांनी अशा कितीही अफवा पसरविल्या तरी त्याला मी घाबरणारी नाही. मी काँग्रेसची आहे, मी काँग्रेसच्या तिकिटावरच उमेदवारी लढविणार आहे, असा थेट इशारा आमदार धानोरकर यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी शिवानी वडेट्टीवार आपली स्पर्धक नसल्याचे सांगितले.
दरम्यान प्रतिभा धानोरकर यांच्या पक्षातील कोणत्या लोकांवर रोख आहे, याची चर्चा रंगली आहे. आपण चंद्रपूर ही आपल्या हक्काची जागा आहे, ती सोडणार नाही, असे स्पष्ट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही सांगितल्याचे त्यांनी म्हटले.