पुणे : भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज साताऱ्यातील मलठणमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात गोरे जखमी झाले आहेत. गोरे यांच्या अपघातानंतर त्यांच्या वडिलांनी घातपाताचा संशय वर्तवला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मला याविषयी घातपाताची शंका वाटते, असं जयकुमार यांचे वडील भगवान गोरे म्हणाले आहेत. आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सध्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केलीय.
“तिथे अपघात होण्यासारखं तसं काही नाहीय. कठडा तोडून कसंकाय अपघात होऊ शकतो? मला घातपाताची शंका येतेय. हे फलटणमध्येच घडतंय. त्यामुळे मला शंका आहे”, असं आमदारांचे वडील भगवान गोरे म्हणाले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भगवान गोरे यांच्या विधानावर भूमिका मांडलीय. “मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही. जया भाऊ झोपेत होते त्यामुळे मी त्यांचं ऐकलेलं नाही. आणि ही आता बोलण्याची वेळ नाहीय. आम्हाला आता जयाभाऊंची प्रकृती जास्त महत्वाची आहे. जयाभाऊंच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली ते आम्ही व्यवस्थित ऐकू. त्याबाबत त्यांची काही शंका असेल तर निश्चित चौकशी करु”, अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी मांडली.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितली घटनेची सविस्तर माहिती
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णालयात जाऊन गोरे यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केलीय. “फलटणला जात असताना जयकुमार यांचा अपघात झाला. फलटणजवळ गेल्यानंतर ड्रायव्हरच्या हातून गाडीचा ताबा गेला आणि गाडी कठडा तोडून जवळपास 60 फूट खाली कोसळली. आता सगळे व्यवस्थित आहेत. आमदारांची तब्येत सुधारतेय”, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.
‘हा अपघातच, घातपात नाही’
एककीकडे जयकुमार यांच्या वडिलांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित घटना ही घातपाताची नसून अपघाताची असल्याची माहिती दिलीय.
“ड्रायव्हर कॉन्शियस होता. पण जे काय झालंय त्यावर ड्रायव्हरला झोप लागल्याची शक्यता आहे. मला घातपाताची सूतराम शक्यता वाटत नाही. हा पहाटेच्या डुलकीमुळे झालेला अपघात आहे”, अशी प्रतिक्रिया खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
“मी सध्या गोरे कुटुंबियांच्यासोबतच आहे. पण त्यांच्या वडिलांशी माझं बोलणं झालेलं नाही. अपघाताची माहिती समजल्यानंतर मी घटनास्थळी गेलो होतो. सकाळी तीन वाजता अपघात झालाय. जयकुमार यांची प्रकृती सुधारतेय”, अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.