“महायुतीचा अद्याप ठाण्याच उमेदवार जाहीर झालेला नाही. कल्याणमध्ये गोंधळाची स्थिती आहे. दिल्लीतून उमेदवारी जाहीर करतील, असं दिसतय. याच्या हातात काही दिसत नाहीय” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. “कोल्हापूर, हातकणंगले आणि कोकणात भाजपा, मिंधे गटाचे उमेदवार, पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरु केलय, जी आमिष दाखवली जातायत त्याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी” असं संजय राऊत म्हणाले. “5 कोटी निधी देण्याची आमिष दाखवता, सरपंचांना धमक्या देता, एकाबाजूला विरोधीपक्षावर आचारसंहिता कठोर पद्धतीने लावली जाते. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचे लोक सरंपचांना धमक्या देत आहेत. मतदारांना आमिष दाखवत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे. निवडणूका योग्य पद्धतीने होत नाहीयत हे यातून दिसतं” असं संजय राऊत म्हणाले.
छत्रपती शाहू महाराजांबद्दल संजय मंडलिकांनी वादग्रस्त विधान केलं. मंडलिकांनी थेट छत्रपती शाहूंवर प्रश्न उपस्थित करत ते कोल्हापूरचे नसून खरे वारसदार नसल्याचं विधान केलं. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “मग मंडलिक वारसदार आहेत का? संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे शाहू महाराजांच्या जवळचे होते. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन सदाशिवराव मंडलिक काम करत होते. कोल्हापुरच्या गादीबद्दल महाराष्ट्राला आदर, श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकतेय हे दिसल्यावर महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानावर चिखलफेक करता, हे लक्षण चांगलं नाही” असं संजय राऊत म्हणाले.
‘हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष करतील’
नांदेडमध्ये अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते नकली पक्ष आहेत, असं म्हटलं. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “अमित शाहंच्या आधी पंतप्रधान मोदींनी चंद्रपूरमध्ये असं विधान केलेलं. पैसा, सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरुन एखादा पक्ष खरा-खोटा ठरवणार असाल, तर जनता ते सहन करणार नाही. अमित शाह म्हणतायत, त्याच नकली शिवसेना प्रमुखांची भेट घेण्यासाठी, नाक रगडण्यासाठी ते अनेकदा मातोश्रीवर आले. पाठिंबा मागितला. आता तुम्ही खोटे गोटे गळ्यात अडकवून फिरता, त्यांना तुम्ही असली म्हणता, हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस हे खरे पक्ष आहेत” असा दावा राऊत यांनी केला.