नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप राष्ट्रवादीवर केला त्यावर स्वत: खासदार सुप्रिया सुळेंनीच बोट ठेवत चौकशीची मागणी केलीय. राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता चौकशी करावी, अशी मागणी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी केलीय. पंतप्रधान मोदींनी 27 जूनला राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करताना, जलसंधारण आणि शिखर बँक अर्थात, महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावरुन विरोधकही टीका करतच असतात. पण आता सुप्रिया सुळेंनीच चौकशीची मागणी केली. त्यामुळे आता अजित पवार काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते जास्त महत्त्वाचं असणार आहे.
अजित पवार राष्ट्रवादीच्या जवळपास 40 आमदारांना घेऊन भाजपसोबतच सत्तेत आहेत. मात्र, मोदींच्या आरोपांवर बोट ठेवत, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांकडेच अप्रत्यक्ष बोट दाखवल्याची चर्चा आहे. 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणी जेव्हा सुप्रिया ताई करत होत्या. त्यावेळी तुमचेच भाऊ आहेत, अशी कुजबूज मागच्या बेंचवरुन काही खासदारांनी केली. त्यावर माझा एकच भाऊ नाही तर, संसदेतले 800 जण माझेच भाऊ आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
एकीकडे सुप्रिया सुळे लोकसभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी करत होत्या. तर इकडे पुण्यात अजित पवारांनी शिखर बँकेतल्या घोटाळ्याच्या आरोपांवर उत्तर दिलं. ज्या बँकेत घोटाळ्याचे आरोप झाले, ती महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक 609 कोटींनी नफ्यात असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या बँकेत घोटाळा झाल्याचा आरोपही मोदींनी केला होता.
अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीत उभी फूट पडली. रद पवारांचा मार्ग वेगळा आहे आणि अजित पवारांचा मार्गही वेगळा झालाय. त्यामुळे आता ताईंनीच घोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशीची मागणी करुन, दादांना घेरल्याचं दिसतंय.