महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) परीक्षेसंदर्भात पुन्हा गोंधळ निर्माण केला गेला आहे. एमपीएससीची परीक्षा दुसऱ्या परीक्षेच्या तारखेला आली आहे. यामुळे कोणती परीक्षा द्यावी, असे संकट विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाले आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्थेकडून (आयबीपीएस) घेण्यात आलेल्या परीक्षेच्या दिवशीच एमपीएससीने पेपर ठेवला आहे. ‘आयबीपीएस’च्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली होती. तर ‘एमपीएससी’ची परीक्षा यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. परंतु आता २५ ऑगस्टला परीक्षा होत आहे. त्याच दिवशी आयबीपीएसची परीक्षा होत आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे नवीन संकट आले आहे. रात्रंदिवस स्पर्धा परीक्षाच्या अभ्यास करुन सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांची परीक्षा अवघड करण्याचे काम एमपीएससीकडून होत आहे. एमपीएससीने आयबीपीएस परीक्षा असलेल्या दिवशीच पेपर ठेवला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होणार असल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेची संधी सोडावी लागणार आहे.
एमपीएससी आणि आयबीपीएस दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्हीकडे अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘आयबीपीएस’च्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली होती. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससीची परीक्षा आधीच दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर या परीक्षेची तारीख २५ ऑगस्ट निश्चित केली. परंतु ही तारीख निश्चित करताना कोणताही विचार एमपीएससीकडून करण्यात आला नाही. २५ ऑगस्ट रोजीच आयबीपीएस लिपिक पदाची परीक्षा असताना त्या दिवशी एमपीएससीने पेपर कसा ठेवला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकाच दिवशी आयबीपीएस आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांना कुठल्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होती. परंतु आयबीपीएस लिपिक परीक्षा असल्याने कर्नाटक लोकसेवा आयोगाने त्यांच्या परीक्षेच्या तारखेत बदल केला. त्याप्रमाणे एमपीएससीनेही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्या, अशी मागणी होत आहे.