मुंबई : एसटी महामंडळात बऱ्याच वर्षांनी नवीन कोरी सीएनजी लालपरी ( CNG BS-6 ) बस दाखल झाली आहे. महामंडळाने ( MSRTC ) प्रथमच टाटा कंपनीच्या चासिसवर ( Tata Chassis ) सीएनजी बसेसची बांधणी केली आहे. यापूर्वी सीएनजी बसचा प्रयोग 2009-10 मध्ये झाला होता. परंतू त्यावेळी त्याबसेस सिटी बस म्हणून सुरु करण्यात आल्या होत्या. आता बऱ्याच वर्षांनी एसटी महामंडळात सीएनजी बसेस लांबपल्ल्याच्या मार्गावर धावणार आहेत. त्याची सुरुवात ठाणे आगारातून झाली आहे.
एसटीची पहिली BS – 6 CNG परिवर्तन बस लालपरी महामंडळात दाखल झाली आहे. त्यामुळे आता एसटीचा प्रवास डीझेल एवजी पर्यावरण स्नेही अशी सीएनजी गॅसवर होणार आहे. या बसेस पूर्वी सिटी बस म्हणून साल 2009-10 मध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा सीएनजी बस बीएस-6 मानकांनूसार दाखल होत आहे. या बसची बांधणी माईल्ड स्टीलची असून ही टाटाच्या नव्या चेसिसवर बांधण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरातील ( औरंगाबाद ) चिखलठाणा एमआयडीसी येथील एसटीच्या वर्कशॉपमध्ये या बसेसची बांधणी करण्यात आली आहे. या बसेसची क्षमता 44 प्रवासी इतकी आहे. या बसेसला पॅनिक बटण, सोयीस्कर हॅंडल, आरामदायी आसने देण्यात आली आहेत.
एसटी महामंडळाने टाटा कंपनीच्या 700 चासिस खरेदी केल्या होत्या. त्यापैकी 400 चासिसवर साध्या डीझेल बसची बांधणी होणार आहे. तर 200 बसेस या हिरकणी गुलाबी रंगाच्या असणार आहेत. तर 50 बसेस या संपूर्ण स्लिपर दर्जाच्या असणार आहेत. तर 50 बसेस या सीएनजीच्या असणार आहेत. दापोडीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत टाटाच्या चासिसवर संपूर्ण 12 मीटर लांबीची स्लिपर कोच बस बांधण्याचे काम सुरु आहे.
या बसेसमध्ये एअर सस्पेन्शन नसल्याने प्रवाशांना हादरे बसण्याची शक्यता आहे. या बसेसला बसच्या खाली सीएनजीचे पाच सिलेंडर बसविण्यात येणार आहेत. या बसमध्ये 130 वा 135 किलोग्रॅम सीएनजी गॅस भरता येणार आहे. एसटी महामंडळाला रोज 14 लाख लिटर डीझेल लागायचे. केंद्र सरकार महामंडळाला डीझेलची विक्री करताना घाऊक दराचा फायदा सवलत देत नाही. त्यामुळे इतर बल्कमध्ये डीझेल घेऊनही ते महाग पडते. आता सीएनजी आणि येऊ घातलेल्या पाच हजार इलेक्ट्रीक बसेसमुळे इंधनाची बचत होणार आहे.