मुंबई: एसटी महामंडळाच्या (msrtc) विलीनिकरणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर एसटीचे कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील (mumbai) निवासस्थानी जोरदार आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार हाय हायच्या घोषणा देत संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. काही कर्मचाऱ्यांनी तर चपला फेकून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलाही मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या महिलांनीही जोरदार घोषणाबाजी देत आणि निषेध नोंदवत संताप व्यक्त केला. आमच्या शोषणाला फक्त आणि फक्त शरद पवारच जबाबदार आहे, असा आरोप करतानाच आम्ही विलीनीकरणाच्या मागणीवरून तसूभरही मागे हटणार नाही. एसटीचं विलिनीकरण झालंच पाहिजे, त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.
आज दुपारी पावणे चारच्या सुमारास एसटीचे कर्मचारी अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडकले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. अचानक एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन झाल्याने या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. साहेब, त्यांनी आम्हाला प्रत्येकवेळी आश्वासनं दिली. आम्हाला न्याय मिळाला तो न्यायदेवतेमुळे. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आमच्या झालेल्या अन्यायावर आम्ही ठाम आहोत, असं एक आंदोलक म्हणाला.
तर, एसटी महामंडळाचं शोषण फक्त आणि फक्त शरद पवारांमुळे होत आहे. आमच्या शोषणाला सर्वस्वी शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप दुसऱ्या आंदोलकाने केला. आमच्या या लढ्यात 120 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. चोरांचे पुढारी आणि भ्रष्टाचारानं बरबटलेले शरदचंद्र पवार हे याला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आज आम्ही चप्पल भिरकावली आहे. 120 भगिनी कोरड्या कपाळाच्या झाल्या आहेत. त्या पवारांमुळे. कामगारांच्या निषेधापुढे यांच्या बापाला झुकावं लागेल, असा इशाराही या कामगारांनी दिला.
येत्या 12 तारखेला आम्ही बारामतीला धडकणार आहोत. पवारांच्या निवासस्थानी आम्ही आंदोलन करणार आहोत. हिंमत असेल तर आम्हाला रोखूनच दाखवा, असा इशाराही या आंदोलकांनी दिला.
संबंधित बातम्या:
St Worker : शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार
Video : एमर्जंन्सी लॅंडिंगच्यावेळी विमानाला मोठी दुर्घटना, भीषण आग, विमानाचे जागीच तुकडे