Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. याची अंमलबजावणी सोमवारी 1 जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिला या विविध तहसील कार्यालयात मोठी गर्दी करताना दिसत आहेत. पण या योजनेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कीही ठिकाणी सर्व्हर जाम, पोर्टल बंद अशा अनेक समस्यांना महिला तोंड देताना दिसत आहेत.
जळगावात लाडकी बहिण योजनेची कागदपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे जळगावात सेतू सुविधा सर्व्हर जाम झाल्याची माहिती समोर आली आहे. शासनाच्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. त्यामुळे महिलांकडून घेतलेली कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बराच कालावधी लागत आहे, असे सेतू सुविधा कार्यालयातील कर्मचारी सांगत आहेत. तसेच दिवसा काम पूर्ण होत नसल्यामुळे रात्रीही अपलोड करण्याचे काम केले जात आहे. पण तेव्हाही पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने ते होत नसल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या दोन दिवसापासून हे काम सुरु आहे. पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे दाखले निकाली निघत नसल्याचे सेतू सुविधा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. वेगवेगळे दाखले देणाऱ्या सेतू सुविधा कक्षातील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दाखलेही वेळेवर मिळत नसल्याने महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. महिलांची दिवसा गर्दी होत असल्याने असल्यामुळे रात्री वेबसाईटवर कागदपत्र अपलोड करण्याचे काम केले जात असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे शासनाने उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल सर्टिफिकेटची अट रद्द केल्यानंतरही याच दाखल्यांसाठी अनेक महिला सेतू सुविधा केंद्रांवर गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण राज्याची एकच वेबसाईट असून त्याच वेबसाईटवरून काम चालतं. त्यामुळे ही वेबसाईट देखील हँग झाली आहे. यामुळे दाखले देण्यास अडचणी येत असल्याचे सेतू सुविधा कक्षातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वेबसाईट हँग झाल्यामुळे शिक्षणासाठी लागणारे वेगवेगळे दाखले देण्यासही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासन लागले जोमने तयारीला लागला आहे. जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी सुटणार नाही, यासाठी तहसील कार्यालय, सर्व बँक अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 21 ते 60 वयोगटातील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
त्यासोबतच अमरावती जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी सेतू केंद्रावर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, आधार अपडेट या सर्वच गोष्टींचे सर्व्हर स्लो झाले आहे. वेबसाईट स्लो झाल्याने अनेक महिलांनी सेतू केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अमरावती शहराच्या भातकुली तहसीलच्या सेतू केंद्रावर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी सलग तिसऱ्या दिवशी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर गर्दी झाली आहे. अनेक महिला या रांगा लावून रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गर्दी करत आहेत. तर अनेक तालुक्यातही महिलांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.
तसेच नाशिकमध्ये लाडकी बहिण योजनेचे पोर्टल अद्याप सुरुच झालेले नाही. योजनेची घोषणा झाल्यानंतरही अनेक ठिकाणी पोर्टल बंद असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या योजनेचे पोर्टल 1 तारखेला सुरु होणं अपेक्षित होते. पण हे पोर्टल अद्याप बंदच असल्याचे पाहायला मिळत आहे. सेतू कार्यालयात सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.
कोल्हापुरात लाडकी बहिण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या नागरी सेवा केंद्रात नागरिकांची रांग पाहायला मिळत आहे. अनेक महिलांसह पुरुषही जन्माचा दाखला मिळवण्यासाठी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवूनही कोल्हापुरातील महिलांची रांग कायम आहे.
नागपुरात लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्र गोळा करण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरात लोकांची गर्दी दिसत आहे. अनेक लोक रांगेत लागून जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्र गोळा करत आहे. त्यामुळे राज्यभरात लाडकी बहीण योजनेचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.