दादर, मुंबई | 06 डिसेंबर 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यंदाचा हा 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आंबेडकरी अनुयायींनी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटला आहे… देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत आले आहेत. बाबासाहेबांच्या स्मृतींना हे अनुयायी अभिवादन करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केलं. याच सोबत सगळ्याच पक्षाचे नेते आज चैत्यभूमीवर येत आहेत. बाबासाहेबांच्या स्मृतींसमोर ते नतमस्तक होत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने चैत्याभूमीवर भीमसागर लोटला आहे. या आंबेडकरी अनुयायींना राहण्यासाठी तात्पुरता निवारा, सीसीटीव्ही कॅमेरे, LED टीव्ही, हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. तसंच मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुच्छित प्रकार घडू त्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 250 अधिकारी, 2 हजार कर्मचारी, सीआरपीएफ च्या 9 तुकड्या, आरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक, हरविणाऱ्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके, सोबत समता सैनिक दलाचे 18 हजार जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, शिवाजी पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ या ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनुयायांसाठी प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्हीआयपी कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बाकडे, विद्युतपुरवठा, मोबाइल चार्जिंग आदी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सर्वांना माझा आदरपूर्वक जय भीम…बाबासाहेबांनी भारताला कायदे दिले. त्यांचसोबत शिक्षण अर्थव्यवस्था, शेती याचे विचार दिले. बाबासाहेबांनी लिहलेलं ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली. आलिकडेच 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला, ही अभिमानाची बाब आहे. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर देशासाठी केला. त्यांच्या विचारांनी देशाला नवी दिशा दिली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर येथील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन केले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई… pic.twitter.com/BLkOJU9P8c
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 6, 2023
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. बाबासाहेबांना नमन करण्यासाठी आज आलो आहे. बाबासाहेबांनी लाखोंचा उद्धार केला. देशाला सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली. महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन आहे की आपण सर्वांनी मिळून संविधान वाचवलं पाहिजे, असं वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दीक्षाभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आलो. संविधानाचे चारही स्तंभ केंद्र सरकार रोज तुडवत आहे. संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारला खाली खेचण्याचा संकल्प आज करावा लागेल. गुन्हेगारीत आणि भ्रष्टाचारात महाराष्ट्र पुढे आणण्याचे काम या सरकारने केले. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्येत पण महाराष्ट्र नंबर 1 वर सरकारने आणला, असं पटोले म्हणाले.