मुंबईः केंद्रीय तपास यंत्रणांना वेगवेगळे अधिकार दिलेले असतात. त्या पद्धतीनं त्यांचा वापर होतो. माझ्याही नातेवाईकांवर तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या. मात्र ही कारवाई पारदर्शी व्हावी, एवढीच माफक अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी आज ईडीने कारवाई केली आहे. अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले होते. तसेच आता अनिल परबांचा नंबर लागणार असे सूतोवाचही त्यांनी केले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली. त्यामुळे काहींनी सूतोवाच केल्यानंतर गोष्टी त्या पद्धतीनं घडतात, हे चुकीचं असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अनिल परब यांच्यावरील ईडीची छापेमारी आणि त्यांची सुरु असलेली चौकशी पारदर्शी व्हावी, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या कारवाया होतच असतात. त्यांना जो तपास करायचा अधिकार आहे, त्यानुसार कारवाई चालू आहे. परंतु ही कारवाई पारदर्शक असावी. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारकडेही यंत्रणा आहेत. त्यांनाही नियमानं कारवाईचा अधिकार दिला आहे. फक्त या अधिकारांचा गैर वापर होऊ नये, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
दरम्यान, अनिल परबांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी आहे. सूडाच्या कारवाायांमुळे आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. तसेच अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जातोय, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतकं वाईट वळण कधीच मिळालं नव्हतं. महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्यासाठीच हे सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.