रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 डिसेंबर 2023 : वेगवान सेवा आणि आकर्षक लूकमुळे वंदे भारत एक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय झाली आहे. देशभरात अनेक गाड्या धावत असून महाराष्ट्रतही वंदे भारत एक्पस्प्रेसची सेवा पाच ठिकाणी सुरू आहे. आता महाराष्ट्राला सहावी रेल्वे मिळाली असून नव्या वर्षात मुंबई – जालना ‘वंदे भारत’ सुरू होणार आहे. प्रवाशांसाठी ही चांगली बातमी असली तरी मुंबईकरांची डोकेदुखी यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
कारण या नव्या गाडीसाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. परिणामी मुंबईतली अनेक रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, तसे नियोजन आहे. मात्र याचा फटका सामान्य मुंबईकरांना बसेल. त्यांचा प्रवास आणखी विलंबाने होण्याची शक्यता आहे.
राज्याला मिळणार सहावी वंदे भारत
‘वंदे भारत’ काही काळातच लोकप्रिय झाली आहे. प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात पाच ठिकाणी ‘वंदे भारत’ धावत आहे. राज्यात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरू झाली होती.
सहा दिवस धावणाऱ्या या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या. आता महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून राज्याला सहावी वंदे भारतही मिळणार आहे.
‘वंदे भारत’ मुळे लोकलच्या वेळेत बदल
मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी- सोलापूर व सीएसएमटी – मडगाव अशा तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. येत्या 30 डिसेंबरपासून ही नवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नव्या वर्षात मुंबई ते जालना ही ‘वंदे भारत’ची सेवा सुरू होणार आहे. मात्र मुंबईकरांचा मनस्ताप यामुळे वाढू शकतो. कारण हे. या गाडीसाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी 13 रेल्वेगाड्या आणि 7 लोकलच्या वेळा बदलण्याचे नियोजन आहे. परिणामी मुंबईकरांचा प्रवास आणखी विलंबाने होण्याची चिन्हे आहेत.