मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून मुंबईत ठिकठिकाणी रेलभरो आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, निरंजन डावखरे, मनोज कोटक यांच्या नेतृत्वात चर्नी रोड, चर्चगेट, कांदिवली आदी ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. मात्र, या आंदोलना दरम्यान वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना रेल्वे पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार चर्नी रोड परिसरात घडला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं आंदोलन कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना ही मारहाण झाली. त्यात टीव्ही 9 मराठीच्या कॅमेरामनलाही धक्काबुक्की करण्यात आली. (Journalists who went to cover the BJP’s agitation were pushed by the railway police)
प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चर्नी रोड स्टेशनला आंदोलन करत होते. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरु करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होतं. त्यावेळी रेल्वे पोलिसांकडून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध माध्यमांचे पत्रकार आणि कॅमेरामन या संपूर्ण घटनेचं चित्रिकरण करत होते. त्यावेळी रेल्वे पोलिसांकडून त्यांनाही रोखण्याचा प्रयत्न झाला. रेल्वे पोलिसांनी यावेळी काही पत्रकारांना धक्काबुक्कीही केली. टीव्ही 9 मराठीच्या कॅमेरामनलाही यात धक्काबुक्की झाली. तेव्हा आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी पोलिसांच्या या वर्तनाला तीव्र विरोध केला. तसंच पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.
रेल्वे पोलिसांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यानं अक्षय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनवरच ठिय्या आंदोलन सुरु केलं. त्यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना आश्वस्त करण्यात आलं. त्यानंतर अक्षय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. मात्र, आंदोलनाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अशाप्रकारे धक्काबुक्की झाल्याचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांचे रेलभरो आंदोलन कव्हर करत होतो. यादरम्यान सर्व पत्रकारांनी वार्तांकन करताना चर्चगेट ते चर्नीरोडपर्यंत रेल्वेतून प्रवास केला. हा प्रवास अवैध असल्याने टीसीकडून प्रविण दरेकर यांच्याकडून दंड वसूल केला. पत्रकारांना देखील दंड मागण्यात आला त्यावर या कव्हरेजनंतर दंड भरु ही भुमिका मी स्वतः मांडत होतो. मात्र आरपीएफ(Railway Protection Force)च्या जवानांनी कॅमेरामनला धक्काबुक्की, फायबर रॉडने कुचके मारणे, असे प्रकार सुरु केले. मी हे सर्व दाखवत असताना मला देखील धक्काबुक्की झाली, अशी माहिती आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
‘लोकल प्रवास नाकारणारं हे जनताविरोधी ठाकरे सरकार’, भातखळकरांचा हल्लाबोल; कांदिवलीत रेलभरो आंदोलन
Journalists who went to cover the BJP’s agitation were pushed by the railway police