मुंबईः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS), भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचीही मोठी सभा नुकतीच पार पडली. यामुळे आता रिपब्लिकन पक्षही (RPI) अॅक्टिव्ह मोडमध्ये आला आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 04 मे चा अल्टीमेटम दिला आहे. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी जबरदस्ती करू लागले तर त्यांच्या संरक्षणासाठी भीमसैनिक सरसावणार आहेत. मनसेच्या कृतीला उत्तर देण्यासाठी भीमसैनिक पुढे येतील,असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे. संविधानाचे राज्य असून इथे कुणाचे दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. भीमछाया सांस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रूझ येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते.
राज ठाकरे यांनी 3 मे रोजी ईद असल्यामुके भोंग्यांना हात लावणार नाही मात्र 4 मे ला भोंगे काढणार असल्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका संविधान विरोधी असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील. पोलिसांनी सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे असे रामदास आठवले यांनी आवाहन केले आहे. समाजात शांतता बंधुता सौहार्द टिकविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा सदैव पुढाकार राहिला आहे. भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या अतिरेकी भूमिकेला विरोध करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मौदानात उतरणार आहे. तसेच कातडी बाचाऊ कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्षात स्थान मिळणार नाही.रिपब्लिकन पक्ष हा संघर्षशील आक्रमक क्रांती करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, याची प्रचिती दाखवा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
येत्या 10 मे रोजी पदोन्नती मध्ये एस सी एस टी साठी आरक्षण; 2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या घरांना झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्या; भूमिहीनांना 5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी; 1990 चा कट ऑफ डेट मध्ये वाढ करून 14 एप्रिल 2000 साला पर्यंत चे गायरान जमीनी वरील भूमिहीन मागासवर्गीयांचे अतिक्रमण कायदेशीर करावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचे आदेश, रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिले.
येत्या 28 मे रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेशचा प्रचंड मेळावा चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 25 नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागा; मुंबईत रिपब्लिकन पक्ष कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही हा ईशारा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येत्या 15 जून रोजी रिपब्लिकन पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियानाची सांगता होणार असून त्या पूर्वी सभासद शुल्क आणि सभासद नोंद पुस्तक रिपाइंच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात जमा करण्याचे आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत.