मुंबई : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी होतेय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात त्यांची चौकशी होतेय. समीर वानखेडेंची सीबीआयने परवा तब्बल 5 तास चौकशी केली. त्यानंतर कालही त्यांची चौकशी झाली. सीबीआयच्या 2 दिवसांच्या तपासानंतर समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे.
समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत. तसंच हल्ल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
मला सुरक्षा द्या अन्यथा माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला करू शकतो, असं समीर वानखेडे म्हणालेत. मीडियाच्या रूपाने माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असंही ते म्हणालेत.
माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. जे काही कायदेशीर आहे. ते मी न्यायालयात सांगणार आहे. सीबीआयला त्यांची बाजू मांडू द्या. आम्ही सीबीआयला शुभेच्छा देतो, असंही वानखेडे म्हणालेत.
सुरक्षेचा प्रश्न माझ्यासमोर आहे. मी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे सुरक्षेची मागणी करणार आहे. पोलिसांना असंही सांगण्यात आलं आहे. सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावर सतत धमक्या येत आहेत. या सर्व विषयांवर मी मुंबई पोलीस आयुक्तांशी एकत्रित चर्चा करणार आहे, असंही वानखेडे म्हणालेत.
मी सीबीआयच्या तपासात सहकार्य करत असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितलं. माझा सीबीआय आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, मला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या सीबीआयच्या दोन दिवसांच्या चौकशीनंतर आज त्यांच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याआधी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.
समीर वानखेडे यांनी आर्यन खानची शाहरुख खानकडे जेलमधून सुटका करण्यासाठी तब्बल 25 कोटींची खंडणी मागितली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यासह इतर 5 जणांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाची सध्या चौकशी होत आहे. आज या प्रकरणी सुनावणी होतेय.
उमेशपाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराज मोडिकल कॉलेजजवळ गोळी झाडून हत्या केली. या दोघांना मेडिकल चेकअपसाठी प्रयागराजमधल्या कॉलेजमध्ये आणण्यात आलं. तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.