मुंबईः गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय नसलेल्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) पुन्हा एकदा लोकल पॉलिटिक्स करण्याची संधी मिळण्याची चिन्ह आहेत. कारण विधान परिषद (Legislative Council) निवडणुकीसाठी भाजपतर्फे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. येत्या 20 जून रोजी विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात भाजपच्या वतीनं पंकजा मुंडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. झी न्यूज नेटवर्कने संबंधित वृत्ताचा दावा केला आहे. विभानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील राजकारणात फार अॅक्टिव्ह दिसून आल्या नाहीत. मात्र राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान आदी ठिकाणच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये त्या सक्रिय होत्या. आता विधानपरिषदेच्या निमित्ताने त्यांना महाराष्ट्र विधीमंडळाशी पुन्हा जोडले जाण्याची संधी मिळू शकते.
मागील वेळी 2019 मध्ये विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्याविरोधात हार पत्करावी लागल्यानंतर पंकजा मुंडे यांना आता पुन्हा कधी संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागील वेळीदेखील विधान परिषदेवर जाण्याची त्यांची संधी हुकली होती. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यात आली. भाजपचं राष्ट्रीय सचिवपद तसेच मध्य प्रदेश भाजप प्रभारी पदही त्यांना देण्यात आलंय. दरम्यान, भाजपच्या राज्यातील विविध कार्यक्रमांमध्ये अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे जवळपास गैरहजरच राहिलेल्या दिसून आल्या. मुंबईतील ओबीसी आरक्षणासाठीचा मोर्चा असो वा औरंगाबादमधील जल आक्रोश मोर्चा असो. मराठवाड्यातील आक्रमक नेत्या म्हणून परिचित असलेल्या पंकजा मुंडे यांना या राजकीय आंदोलनात संधी मिळाली नाही अथवा त्यांना आमंत्रितही करण्यात आलं नव्हतं. पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांनीदेखील राष्ट्रीय नेतृत्वालाच जवळ करायचं ठरवेलं दिसून येतंय. नुकतंच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाला त्यांनी महाराष्ट्रातील दिग्गज भाजप नेत्यांना आमंत्रित न करता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आमंत्रित केलं होतं. यावरूनही पंकजांची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर नाराजी दिसून आली. मात्र पंकजांची ही नाराजी विधानपरिषदेच्या उमेदवारीद्वारे दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
3 जून रोजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी विधानपरिषद निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली तर त्याचं नक्की सोनं करणार, असं वक्तव्य केलं होतं. मात्र त्याचबरोबर मी कधीही संधीची वाट पाहत नाही. केवळ काम करत राहते, असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं.
भाजपनं संधी दिल्यास विधान परिषद निवडणुकीला उभं राहण्याची तयारी पंकजा मुंडे यांची आहे. मात्र त्या विधान परिषदेवर गेल्यास बीड विधानसभा निवडणुकीत भक्कम विजय मिळवलेल्या धनंजय मुंडे यांना कोण आव्हान देणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पंकजांनी विधान परिषद नव्हे तर विधानसभाच लढवावी, असाही एक सूर त्यांच्या समर्थकांमध्ये ऐकायला मिळतोय.