मनोहर शेवाळे, मालेगाव, नाशिक | 29 ऑक्टोंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ललित पाटील याच्या चालकाने नदी पात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढले जात आहे. पाच दिवसांपासून ड्रग्ससाठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने नाशिकमध्ये ऑपरेशन राबवले होते. नाशिक जिल्ह्यातील लोहनेर ठेंगोडा येथे असलेल्या गिरणा नदीत फेकलेला कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या टीमने ४ तास स्कुबा डायव्हरच्या मदतीने अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले होते. आता पुन्हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम नाशिकमध्ये आली आहे.
ललित पाटील याचा चालक सचिन वाघ याने नदीत फेकलेले ड्रग्स शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक पुन्हा रविवारी देवळा तालुक्यात आले. ठेंगोडा येथील गिरणा नदीवरील पात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढले जात आहेत. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने पुन्हा ड्रग्सचा शोध घेतला जाणार आहे. १५ फूट खोल नदीपात्रात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. तसेच हे ड्रग्स शोधासाठी गिरणा नदीवरील साठवण बंधाऱ्यातील पाणी सोडले गेले आहे. ललित पाटील याची पोलीस कोठडी सोमवारी संपणार आहे. यामुळे त्यापूर्वी माहिती जमा करण्यासाठी पोलिसांकडून तपासात गती देण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा ललित पाटील याची कोठडी वाढवून पोलीस मागण्याची शक्यता आहे.
ललित पाटील याचे एनकाउंटर केले जाईल किंवा त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू होईल, असा दावा पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही हाच दावा केला होता. त्यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पोलीस कस्टडीमध्ये असणाऱ्या कोणत्याही आरोपीला धोका होत नाही. 24/7 हे आरोपी पोलिसांच्या निगराणीमध्ये आहेत. सुषमा अंधारे यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी राज्याच्या महासंचालकांकडे द्यावी, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.