मुंबईः राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सोडवताना छत्रपती संभाजीराजेंच्या (Sambhajiraje) घराण्याचा नक्कीच सन्मान करू. मात्र शिवसेनेचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच असतील, अशी भूमिका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. एकिकडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा संकल्प संभाजीराजेंनी केलाय. त्यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची विनंती ते करत आहेत. इतर पक्षांप्रमाणेच शिवसेनेनेही (ShivSena) पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र शिवसेनेचा पाठिंबा असेल फक्त आधी छत्रपतींनी शिवबंधन बांधावे, असा प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. संभाजीराजेंनी काल हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास असून ते छत्रपतींच्या घराण्याचा नक्कीच सन्मान करतील असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलंय. त्यावर संजय राऊतांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या तिढ्यावरून शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेल्याचे चित्र सध्या तरी दिसून आले आहे.
संभाजीराजेंनी व्यक्त केलेल्या अपेक्षेवर उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही निश्चितच छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान करू. पण राज्यसभेच्या जागेचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच असतील. त्यामुळे शिवसेनेने संभाजीराजेंविरोधात उमेदवार निश्चित केल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत उद्धव ठाकरे लवकरच घोषणा करतील, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
कोल्हापुरचे नेते संभाजीराजेंविरोधात शिवसेना राज्यसभेसाठी कोल्हापुरचेच शिवसेनेचे नेते संजय पवार यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. लवकरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करतील.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संजय पवारांच्या उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वीच कोल्हापुरातून संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून आपण संभाजीराजेंविरोधात राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.