मुंबईः नवनीत राणा यांच्या MRI वरून शिवसेनेनं आज लिलावती रुग्णालयाविरोधात (Lilavati hospital) पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पोलीस ठाण्यात पोहोचलं. नवनीत राणा (Navneet Rana) यांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले गेले, हा मुख्य आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणा यांचे फोटोसेशन झालेच कसे? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला. सेनेने आज बांद्रा पश्चिम पोलीस ठाण्यात लीलावती रुग्णालय प्रशासन विरोधात लेखी तक्रार दाखल केली. सेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि युवा सेनेचे राहुल कणाल यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयात धडक देवून प्रशासनाला धारेवर धरले होते. आज या चौघांनी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशन गाठून रुग्णालय विरोधात तक्रार दाखल केली.
लिलवाती रुग्णालयाविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर शिवसेनेचं हे शिष्टमंडळ इंडियन मेडिकल कौंसिलकडे करणार असल्याचं शिवसनेनं सांगितलं आहे. त्यामुळे या संस्थेमार्फतही लिलावतीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवनीत राणा यांचे एमआरआय सुरु असताना त्यांनी मान वर करून पाहिल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. स्पाँडिलेसिसच्या रुग्णाला अशा प्रकारे मान वर करून पाहता येत नाही, मग नवनीत राणा यांची ही ड्रामेबाजी सुरु होती का? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. तसेच नवनीत राणा यांचे मान आणि पोटाच्या दुखण्यासंदर्भात दोन एमआरआय केल्याचं रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आलं. त्याचा रिपोर्ट अद्याप का आला नाही, असा सवालही शिवसेनेनं केला आहे. नवनीत राणा यांनाही यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आधी उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या दुखण्याचा रिपोर्ट द्या, मग मी माझ्या दुखण्याचे रिपोर्ट दाखवते, असं प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी दिलं.