मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून (ST) मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीकाही झाली. वयाच्या पंच्चाहत्तरीत कोण एसटीने प्रवास करणार? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियातून टिंगलटवाळीही झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या चार दिवसांत 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान राज्यभरातून (maharashtra) सुमारे 1 लाख 51 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. स्वत: एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून 50 टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा पावसाळी अधिवेशनात केली होती. 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा 26 ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.
या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत राज्यभरात 1 लाख 51 हजार 552 ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे चन्ने म्हणाले.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाकडे 34 लाख 88 हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 14 लाख 69 हजार आहे.