मुंबई : मुंबईत यापुढे अधिकृत पार्किंगच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या अनधिकृत पार्किं केल्यासही दंड ठोठावला जाणार आहे. या संदर्भात प्रभावी अंमलबाजवाणीसाठी माजी सैनिकांना नेमण्याचे कंत्राटदारांना आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर आणि रस्त्यांजवळ अनधिकृत ‘पार्किंग’ होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहनांची गती मंदावत आहे, असे मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने ‘पार्क’ करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे विविध 146 ठिकाणी तब्बल 34 हजार 808 वाहने ‘पार्क’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरीही अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी पार्किंगजवळील एक किलोमीटरच्या रस्ता, तसेच दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत.
याबाबत जनजागृती होण्यासाठी सूचना देणारे फलक लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 7 जुलै 2019 पासून याची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून सदर दिनांकापासून संबंधित ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहन ‘पार्क’ केल्याचे आढळल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन नियोजन आणि अंमलबजाणी विषयक सर्वस्तरीय प्रयत्न नियमितपणे करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील अनधिकृत पार्किंग बाबत सुनियोजीत कारवाईचे सुतोवाच करण्यात आले आहे. या अंतर्गत महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 146 पार्किंग ठिकाणांलगतच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर आणि महत्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात येत आहेत. या ‘नो पार्किंग झोन’च्या ठिकाणी अनधिकृत ‘पार्किंग’ आढळून आल्यास त्यावर 10 हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. तसेच सदर दंड न भरल्यास संबंधित वाहन ‘टोइंग मशीन’द्वारे उचलून नेले जाणार आहे.
दरम्यान, अनधिकृत पार्किंग बाबत अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कंत्राटदार नेमण्याचे आदेश देण्यात येत असून संबंधित कंत्राटदारास माजी सैनिकांची नेमणूक करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर यासाठी आवश्यक त्या प्रमाणात ‘टोइंग मशीन’ भाड्याने घेऊन वाहतूक पोलीसांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.