मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आधी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यानंतर नेत्यांना गावबंदी करण्यात आली. आता तर आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू केली आहे. राजकारण्यांची घरे पेटवली जात आहेत. त्यांची वाहने अडवली जात आहेत. राज्यभरात आतापर्यंत 141 गुन्हे दाखल झाले आहेत. बीडला या आंदोलनाची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. बीडमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. राज्यात मराठा आंदोलनाचे 141 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 168 लोकांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात 146 आरोपींना 41 अ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये 54 गुन्हे दाखल करण्यात आले असून 106 जणांना अटक करण्यात आली आहे.
बीडमध्ये 20 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, या 20 पैकी सात गुन्हे हे जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आहेत. बीडमध्ये गुन्हे कमी दाखल झाले असले तरी जाळपोळीच्या घटना अधिक झाल्या आहेत. अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बंगल्यालाही आग लावण्यात आली होती. या सर्व घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. खासकरून बीडच्या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
बीडमध्ये जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बीडमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. बीडच नव्हे तर संभाजी नगर ग्रामीण आणि जालन्यातही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. बीडमधील तणाव अटोक्यात आणण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. ज्या ज्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन आणि जाळपोळ झाली, तिथे कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यामुळे आतापर्यंत 17 एसआरपीएफच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. 7 हजार होमगार्डही बंदोबस्तावर आहेत. राज्यात हिंसाचारामुळे आतापर्यंत 12 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं होतं. ज्यांनी ज्यांनी हिंसाचार केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाईल. 307 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहनही केलं होतं.